कल्याण लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा? श्रीकांत शिंदे पुन्हा धनुष्यबाण हातात घेणार की कमळ?

0
1

कल्याण लोकसभा निवडणुकीचा जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्यांनी भाजपाच्या (BJP) कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजप कार्यकत्यांनी पत्राद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षीय ताकद पाहता तसेच, या मतदारसंघातील आमदार आणि नगरसेवकांची संख्याबळ पाहता भारतीय जनता पार्टीच्या खासदारांसाठी पोषक असं वातावरण आहे. दिवा शहरातील असंख्य भाजपाच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एकमतानं एक मुखानं हीच मागणी आहे. कल्याण लोकसभेसाठी उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा, अशा प्रकारचं पत्र लिहून बावनकुळे यांना सचिन रमेश भोईर दिवा भाजप मंडळाध्यक्ष यांनी विनंती केली आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

कल्याण लोकसभेची जागा महायुतीनं शिवसेनेला सोडली

कल्याण लोकसभेची जागा महायुतीनं शिवसेनेला सोडली आहे. प्रत्यक्षात कल्याण लोकसभा ही जागा अधिकृत जाहीर करण्यात आली नाही. मात्र, आगामी निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) कल्याण लोकसभा निवडणूक शिसेनेच्या धनुष्य बाणावर लढवणार आहेत.

भारतीय जनता पार्टीनं अनेकवेळा कल्याण लोकसभेवर दावा केला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी कल्याण लोकसभेत दौरे केले. त्यामुळे भाजप सेनेत अनेकदा खटके उडाले आहेत. भाजप सेनेचा अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आला वरिष्ठांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, पुन्हा निवडणूक जाहीर होताच, भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभेवर दावा केल्यानं पुन्हा एकदा भाजप सेनेची धुसपुस सुरू असल्याचं दिसून येत आहे.

अधिक वाचा  मॉडर्न विकास मंडळाचे द्विदशकी “मोफत तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र” नामदार चंद्रकांत दादांच्या हस्ते उद्घाटन ५७ रुग्णांसाठी ठरलं जीवनदायी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा धनुष्यबाण हातात घेणार की कमळ?

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल, त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे. तरी येणाऱ्या निवडणुकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुन्हा धनुष्यबाण हातात घेणार की कमळ? याची उत्सुकता कल्याण लोकसभेत राजकीय कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांना लागली आहे.