आगामी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील हे काँग्रेसने सांगलीतून न उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये जातील, अशी जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत विशाल पाटलांचे नाव असल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आले होते. परंतु, विशाल पाटील यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. मी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे. पण मला जर काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले. ते रविवारी पलूस तालुक्यातील बुर्ली ते सुर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
यावेळी विशाल पाटील यांनी सांगलीचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार भेटला असता तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र, आमचा खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्ष्या गल्लीत बसतोय आणि दररोज तासगाव-सांगली करतो. राजा- राजा करत खांद्यावर हात टाकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन घेऊन नारळ फोडतो, अशा शब्दांत विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांना लक्ष्य केले. काँग्रेस पक्ष आज जोमाने काम करत आहे. तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातोय याचा आनंद आहे. पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडतायत, कारण काहींनी पदे भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली आहे. त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्रचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, असेही विशाल पाटील म्हणाले. आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मात्र, आता आमची हौस भागली आहे. आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे विश्वजीत पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे, असे म्हणत विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अन्य पक्षात जाणार नाही, असे संकेत दिलेत.
विश्वजीत तुझा मुहूर्त लवकरच काढतो, वर विश्वजित कदमांचा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे.यातच देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदमांना थेट मुहूर्त लावतो, या केलेल्या वक्तव्यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर या मुहूर्ताचा माजी मंत्री विश्वजीत कदम यांन खुलासा केला आहे. आपल्या आयुष्यात केवळ आत्तापर्यंत तीन मुहूर्त आले. पहिला पतंगराव कदम व विजयमाला कदम यांच्या पोटी जन्माला आल्यावर, दुसरा पत्नी स्वप्नाली हीच्याशी लग्न आणि तिसरा 2014 पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 63 हजार मतांनी निवडून दिले. हे तीनच मुहूर्त आतापर्यंत महत्वाचे आहेत . आता 2024 ला चौथा मुहूर्त असेल पण आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट मतदारसंघातल्या टेंभू सिंचन योजनेच्या पाण्याबाबत मागत होतो आणि या कामाबाबतीत ठरलेल्या बैठका झाल्या नव्हत्या. यातून देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने बैठकांच्या बाबतीत मुहूर्त लावण्याचा ते वक्तव्य केलं होते. पण त्यावरून महाराष्ट्रात आणि अगदी मतदारसंघात देखील चुकीच्या वावड्या उठवण्याचा प्रयत्न झाला.पण आपण कोणाला घाबरत नाही,असे देखील विश्वजित कदमांनी स्पष्ट केले. सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली या ठिकाणी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कृष्णा नदीवरील बुर्ली-सुर्यगाव पुलाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित समारंभात बोलताना कदम यांनी त्या मुहूर्ताच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले.