भाजपचा ३४- १०-४ चा फॉर्म्युला; भाजपला मित्रपक्षांचे हे अहवाल आवश्यक म्हणाले…. याची यादी सादर करा

0

महाराष्ट्राचे जागापाटपाचे गणित सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजय हा एकमेव निकष असल्याचे सांगत ‘किती जागा जिंकू शकता त्याची यादी द्या’, असे मित्रपक्षांना सांगितल्याचे समजते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर विश्वास टाकलेल्या खासदारांना संधी देणे हे माझे काम असल्याची भूमिका घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना समजाविण्याचे धोरण स्वीकारले आहे.

अमित शहा यांनी ज्या खासदारांना आज त्याग करावा लागेल त्यांचे भविष्यात पुनर्वसन करू, असा शब्दही शिंदे यांना दिल्याचे समजते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे केवळ एकच खासदार असल्याने त्यांच्यासाठी हा प्रश्न जटील नाही. मात्र राज्याच्या प्रत्येक महसुली भागात आमचा खासदार हवा अशी भूमिका अजित पवारांनी सकाळी घेतली होती. त्यानंतर शहा यांनी जिंकून येतील तेवढे मतदारसंघ सांगा, अशी विचारणा केली, असे समजते. यावर लगेचच बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना अजित पवार यांनी बोलावून घेतल्याचे सांगण्यात येते.

बारामती, रायगड या दोन जागा जेथे सुनेत्रा अजित पवार आणि स्वत: सुनिल तटकरे उमेदवार आहेत. त्याही सोप्या नसल्याचे भाजपने लक्षात आणून दिल्याचीही चर्चा होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन जागांसह शिरुर आणि सातारा हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीने मागून घेतले आहेत. शिवसेनेने जागांचा आढावा घ्यावा. कोल्हापूर, हातकणंगले या जागा अडचणीत आल्या आहेत. तसेच मुंबईतील गजानन किर्तीकर यांचे वय आणि कार्यसम्राट असा लौकिक असलेल्या राहुल शेवाळे यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे उभे राहणारे आव्हान लक्षात घेता या जागा सोप्या नाहीत. यवतमाळात नवा चेहरा द्यावा लागेल, असे लक्षात आणून देण्यात आल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

मित्रपक्षांना हे सांगतानाच काही जागांच्या अदलाबदलीचा प्रस्तावही समोर ठेवण्यात आल्याचे कळते. गडचिरोलीत भाजपचा खासदार असला तरी धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादीचे नेते उत्तम उमेदवार आहेत. माढा येथे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर यांना मोहिते पाटील घराणे आणि माजी सभापती रामराजे निंबाळकरांचा विरोध असल्याने ती जागा देण्यात यावी, असेही चर्चेत आल्याचे समजते. तेथे मोहिते किंवा रामराजे यांना आवडेल असा उमेदवार चालेल. माढा अजित पवार गटाला का देत नाही, असा प्रश्नही करण्यात आला आहे असे समजते.

छत्रपती संभाजीनगरला (औरंगाबाद) भागवत कराड यांच्यापेक्षा अतुल सावे चालतील पण शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना संधी द्यावी. वेळप्रसंगी त्यांनी भाजपत प्रवेश करावा, यावरही चर्चा झाली. सध्या मोदींनी भाजपला ४०० जागा जिंकण्याचा जो निश्चय केला आहे, तो पूर्ण करण्यासाठी काम करु अन जिंकावयाच्या जागांची यादी तयार करु, असे ठरल्याचे समजते. त्यासाठीच भाजपला ३४, शिंदे गटाला १० आणि अजित पवार गटाला चार जागा असा प्रस्ताव भाजपने समोर केल्याचे समजते.

शिंदे गटाला मुंबईतील एकच जागा?

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची कामगिरी लक्षात घेता मुंबईतील सहा पैकी केवळ एकाच जागेवर लढा, असा प्रस्ताव भाजपने ठेवला असल्याचे समजते. या प्रस्तावावर शिंदे गट कमालीचा नाराज झाला असून आम्ही तीन जागा लढू असे सांगू लागला आहे. राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकर हे आमचे विद्यमान खासदार आहेत. त्या जागा देण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही तसेच शिवसेनेने जिंकलेली जागाही आमचीच आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

राज्यसभेवर नेमले गेले असले तरी मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघात विजयी होऊ शकतात, असेही शिंदे गटाने भाजपसमोर स्पष्ट केले आहे. भाजपने देऊ केलेल्या जागांची संख्या आम्हाला समाधानकारक वाटत नाही असा मुद्दा उपस्थित करत आज शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. रामदास कदम यांनी तर माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केला असा आरोप करत टीकास्त्र डागले आहे.

राष्ट्रवादीला पाच जागा ही अफवा

आगामी लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) महायुतीकडे तेरा जागांची मागणी असली, तरी किमान अकरा जागांवर तडजोडीची या पक्षाच्या नेत्यांची तयारी आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. आज निवडणुकीबाबत अत्यंत प्राथमिक चर्चा झाली असून राष्ट्रवादीला केवळ पाच किंवा सहा जागा देण्यात येणार असल्याची अफवा आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वतीने राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा काल – आणि आज घेण्यात आला. त्याआधी काल रात्री राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत शहांना १३ जागांबाबतच्या आढाव्याचे सादरीकरण केले. त्यापैकी अकरा जागा या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अनुकूल असल्याचा दावा करण्यात आला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

या सादरीकरणात त्यांनी दावा केलेल्या लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार बहुतांश असल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या जागा कमी केल्यास त्याचा फटका निवडणूक लढविणाऱ्या महायुतीच्या अन्य घटक पक्षाला बसू शकतो, हे भाजपच्या नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

‘जागा वाटपाबाबत अजूनही चर्चा सुरू असून त्याची पूर्वतयारी म्हणून लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेण्याचे काम करण्यात आले आहे. आता अंतिम यादी जाहीर झाल्यावर कामाला सुरुवात केली जाईल,’ अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

या मतदारसंघांचा आढावा

पहिल्या दिवशी नाशिक, दिंडोरी, गोंदिया – भंडारा, दक्षिण मुंबई, हिंगोली, धाराशीव, रायगड. दुसऱ्या दिवशी कोल्हापूर, बुलढाणा, माढा, सातारा, शिरुर, बारामती, परभणी, अहमदनगर दक्षिण, गडचिरोली या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, लोकसभा प्रचारप्रमुख व कृषिमंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री सर्वश्री संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.