महापालिकेच्या पथविभागातील अधिकाऱ्याकडे दोन ते तीन लाखांच्या नोटांचे बंडल आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणला. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तर देत यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे पालिकेतील ‘अर्थ’पूर्ण कामकाज समोर आले आहे.
महापालिकेच्या पथविभागातील एका अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात हा प्रकार घडला. आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते रविराज काळे हे बाणेर परिसरातील एक तक्रार देऊन पथविभागात आले होते. या वेळी कार्यालयातील एक कनिष्ठ अभियंता एका ठेकेदाराकडून नोटांचे बंडल बंद पाकिटात घेत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
ते पाकीट त्या अभियंत्याने त्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं, हा प्रकार पाहिल्यानंतर काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली. त्यावेळी एका ठेकेदाराने हे पैसे आपल्याकडे थोड्या वेळासाठी ठेवण्यासाठी दिले आहेत, अशी उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, काळे यांनी ड्रॉवरमधून ते पाकीट काढत फोडले असता, त्यामध्ये दोन ते तीन लाखांचे नोटांचे बंडल आढळून आले.
या सर्व प्रकारची माहिती काळे हे अधीक्षक अभियंता यांना देण्यासाठी गेले असता, संबंधित अभियंता आणि त्याच्याकडेचे नोटांचे बंडल हे दोन्हीही गायब झाले. ती रक्कम एका ठेकेदाराने आणल्याचे समजते. मात्र, हा प्रकार घडल्यानंतर ती रक्कम कुठे गायब झाली हे मात्र समजू शकले नाही.
घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल –
संबंधित अभियंत्याला विचारले असता, त्याने एका ठेकेदाराने आपल्या टेबलावर पैसे आणून टाकले होते. मी ते घेतले नाहीत. पैसे टाकून मला अडकविण्याचा प्रयत्न होता, असा कांगावा करण्याचा प्रयत्न त्या अभियंत्याने केला. मात्र, या घटनेचा प्रत्यक्ष व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यामध्ये या अभियंत्याने त्याच्या ड्रॉव्हरमध्ये हे पैसे ठेवले होते.
‘आप’च्या कार्यकर्त्यांनी ते बाहेर काढल्यानंतर अभियंत्याने ते पुन्हा ड्रॉव्हरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. महापालिका आयुक्तांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावरती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.