महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर साडे 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.
अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळं बड्या नेत्याच्या उपस्थितीऐवजी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांची अमित शाह यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश व्हावा, अशी इच्छा होती. मात्र, आजच अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो.
अशोक चव्हाण यांना राज्यसभा मिळणार?
अशोक चव्हाण यांनी काल सकाळी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चव्हाण यांनी काल बोलताना दोन दिवसांचा वेळ घेऊन ठरवणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असल्यानं लवकरच पक्ष प्रवेश होणार आहे. भाजप राज्यसभेवर तीन जणांना महाराष्ट्रातून पाठवू शकतं. त्यापैकी एका जागेवर अशोक चव्हाण यांना संधी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.
कुठे आणि कधी होणार पक्षप्रवेश?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. आमदार अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये जाणार आहेत.
काँग्रेसला सोडचिठ्ठी
काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहित अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मी दिनांक 12 फेबुवारी 2024 मध्यान्हानंतरपासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, असं अशोक चव्हाण यांनी या पत्रात म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याच्या पत्रावर माजी विधानसभा सदस्य,असं लिहिलं होतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याआधीच आमदारकीचाही राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट झालं.
मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. त्यानंतर आता काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे तर्क लावले गेले. अखेर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.