माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देण्यामागे कोणती कारणे होती, याची चर्चा सुरु झाली आहे. विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसची मते फुटली होती. याविषयी काँग्रेसकडून एक कमिटी गठीत करुन चौकशी केली होती. या प्रकरणात संशयाची सुई अशोक चव्हाणांवरही रोखली गेली होती.






विश्वासदर्शक ठरावाला अशोक चव्हाण उशिरा पोहोचले
शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या विश्वासदर्शक ठरावाला अशोक चव्हाण उशिरा पोहोचले होते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला होता. या विश्वासदर्शक ठरावासाठी घेण्यात आलेल्या अधिवेशनाला सकाळी अकरानंतर आत हजार राहायचं होतं हे आधीच जाहीर करण्यात आलं होतं. मात्र तरीदेखील अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे काही आमदार उशिरा सभागृहात पोहोचले होते. अशोक चव्हाण यांना उशीर झाल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही. सभागृहात उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना आणि इतर आमदारांना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आली.
जवळपास 250 कोटींचा फंड अशोक चव्हाणांना मिळाला
विकासकामांसाठी जवळपास 250 कोटींचा फंड अशोक चव्हाणांना मिळाला होता. इतका फंड इतर कोणत्याही काँग्रेस नेत्याकडे नव्हता. चव्हाणांच्या भोकर मतदार संघातील वाटरग्रीड प्रोजेक्टला शिंदे-फडणवीस सरकारने निधी दिला होता. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारने मंजुरी दिलेल्या अनेक प्रकल्पांना रद्द केलं होतं. परंतु अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघामध्ये 183 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या वॉटरग्रीड प्रकल्पाला शिंदे-फडणवीस सरकारने 720 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. बाकी काँग्रेस नेत्यांप्रमाणे अशोक चव्हाण देखील भाजपवर थेट टीका करत नसल्याचं सांगितलं जातं.
2014 मध्ये केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा विरोध तितक्या ताकदीने केलेला नाही. तसेच काँग्रेस नेत्यांमध्ये कोणत्याही बाबतीत एकमत नसल्याचं दिसून येतं. फडणवीस मुख्यमंत्री असतांना काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेतली होती.
अशोक चव्हाणांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर कधीही ठोसपणे उत्तर दिले नाही. ऐन भारत जोडो यात्रेच्या पूर्वी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरु झाली होती.
7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा तेलंगणामधून महाराष्ट्रात येणार होती. अशोक चव्हाण भारत जोडो यात्रेच्या नांदेमधील सर्व तयारीच्या कामात व्यस्त होते तेव्हा अब्दुल सत्तार यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं विधान केलं होतं. सत्तारांच्या या विधानानंतर चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. मात्र चव्हाणांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात आला होता. लाखो कार्यकर्ते सहभागी झालेल्या या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते. परंतु यात अशोक चव्हाण गैरहजर होते.










