गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच अनेक छोटे राजकीय पक्ष मोठ्या पक्षासोबत किंवा सत्ताधारी पक्षांसोबत गेले. त्याउलट महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठ्या पक्षात फूट पडली. त्यातील नेत्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपसोबत जात सत्तेत सोमील होण्याचा निर्णय घेतला. या संपूर्ण घडामोडी घडल्या त्यानंतर आता काही दिवसांवरच राज्यसभा निवडणूक आली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपसोबत गेलेल्या पक्षांना जागा मिळवण्यासाठी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत, आता या पक्षांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अशातच काही दिवसांपुर्वी आपल्या समर्थक आमदार खासदारांसोबत भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) ला या राज्यसभा निवडणुकीत एका जागेसाठी का होईना उमेदवारी मिळणार का याच्या हालचाली पक्षात सुरू झाल्या आहेत. ही उमेदवारी कोणाला द्यायची. कारण येत्या काही दिवसात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत त्या अनुषंगाने फायदा कोणाचा होऊ शकतो. यासोबतच इतरही गोष्टींचा विचार, राजकीय समीकरण या जागेला जोडलेली आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील(अजित पवार गट) राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत अनेकांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये इंद्रिस नाईकवडी, नुकतेच काँग्रेस सोडून पक्षात प्रवेश केलेले बाबा सिद्दीकी, नवाब मलिक यांच्याही नावाची राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा सध्या सुरू आहे.
नवाब मलिक
नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे जुने नेते आहेत. कार्यकर्ते राहिले आहेत. मंत्री राहिलेले आहेत. काही काळाआधी भाजपने नवाब मलिकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्याचबरोबर नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपने विरोध केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजपने त्यांना महायुतीत घेण्याबाबत भाजपने पत्र लिहून विरोध देखील केला आहे.
इंद्रिस नाईकवडी
इंद्रिस नाईकवडी हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. त्याचबरोबर ते अजित पवार गटाचे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
बाबा सिद्दीकी
बाबा सिद्दीकी यांनी आपला ४८ वर्षांचा काँग्रेस पक्षासोबतचा प्रवास थांबवला. पक्षाचा हात सोडत त्यांनी दोन दिवसांपुर्वी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हा अद्याप काँग्रेसमध्येत आहे.
ही तिन्ही नावे अल्पसंख्याक समाजातून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पसंख्याक समाजातून एक प्रतिनिधी पाठवायचा असल्याची चर्चा सुरू आहे. अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी जर राज्यसभेवर गेला तर जुन्या प्रथेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याकांना प्रतिनिधीत्व देत आहे हे ही नव्या रचनेमध्ये दिसून येईल. भाजपसोबत सरकारमध्ये गेलो तरी काही फरक नाही हे दाखवण्यासाठीही हा प्रयत्न आहे.
नवाब मलिक यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. भाजपने पहिल्यांदाच त्यांना महायुतीत घेण्यास नाराजी दर्शवली होती. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर बाबा सिद्दीकी यांना मिळण्याची शक्यता आहे कारण ते आधी मंत्री राहिले आहेत, ३ वेळा ते आमदार राहिले आहेत. त्यांचा मुंबईतील जनसंपर्क देखील तगडा आहे. बॉलीवूड क्षेत्रात त्यांची चांगलीच चलती आहे. पण, काल नव्याने पक्षात आलेल्या नेत्याला अजित पवार उमेदवारी देणार का? हा प्रश्न आहे. तर त्यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांची नाराजी त्यांना ओढवून घ्यावी लागेल.