भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १५ ऑक्टोबर रोजी आमने सामने येणार आहेत. मात्र या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हा सामना १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
का बदलली गेली भारत – पाकिस्तान सामन्याची तारीख?
काही दिवसांपूर्वीच वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बहुप्रतिक्षित भारत – पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार होता. मात्र या तारखेत आता बदल करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे. या दिवशी अहमदाबादमध्ये जल्लोषाचे वातावरण असेल. तसेच प्रचंड गर्दी देखील असेल. सुरक्षेच्या दृष्टीने या सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. सामन्याच्या तारखेत बदल केला गेला असला तरीदेखील सामन्याचे ठिकाण तेच असणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. तर वर्ल्डकप स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. तर स्पर्धेतील अंतिम सामना देखील याच मैदानावर रंगणार आहे. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.