महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात अमरावती येथे गुन्हा दाखल झाला आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान भिडे यांना समर्थन देण्यासाठी काेल्हापूरसह सातारा येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आंदाेलन छेडले आहे.
संभाजी भिडे यांचे आज बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे विदर्भ दाै-यातील शेवटचे व्याख्यान आहे. या व्याख्यानास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बुहजन आघाडीने विराेध दर्शविला आहे. दरम्यान भिडे यांच्या विराेधात हाेणा-या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने भिडे यांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आणि सातारा येथे आंदाेलनास प्रारंभ झाला आहे.
कोल्हापुरातील उचगाव परिसरात समर्थन आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाकरे गट शिवसेना, शिंदे गट शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या आंदाेलकांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तर संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ घाेषणा दिल्या.
सातारा येथे देखील संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ विविध हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ घाेषणा दिल्या.