अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडमोडींना वेग आला आहे. पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट अशी उभी फूट पाहायला मिळत आहे. यादरम्यान अजित पवार गटाकडून साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे, असे विधान करण्यात आलं. यावरून आता नवीन वाद पेटताना दिसत आहे.
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून अजित पवार गटाला याबद्दल इशारा देण्यात आला आहे. शरद पवार यांना विठ्ठल म्हणून संबोधणं तत्काळ थांबवा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे.
महाराष्ट्राचे अराजध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची उपमा एखाद्या राजकीय नेत्याला देणं शोभतं का? म्हणून शरद पवारांना विठ्ठल संबोधणं तात्काळ थांबवा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तुमच्या विरोधात आंदोलनं करावी लागतील, असे तुषार भोसले म्हणाले आहेत.
अजित पवार गटाच्या मुंबईत झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार गटाचे नेते छगन भुजभळ यांनी यांसंबंधी विधान केलं होतं. साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. साहेब त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशिर्वाद द्यायला या अशी विनंती भुजबळांनी या सभेत बोलताना शरद पवारांना केली होती. यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.