मुंबई : अजित पवार यांच्या रुपाने भाजपला नवा भिडू मिळाला आहे. अजित पवार यांची युतीत एन्ट्री झाल्यामुळे शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे. अजित पवार सुद्धा 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत आले आहेत. शिवाय शरद पवार यांच्या सारख्या बलाढ्य नेत्याला मात देऊन ते भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे अजितदादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान आलं आहे. आपल्या राजीनाम्याच्या चर्चांवर शिंदे यांनी भाष्य केलं आहे.






अजित पवार यांची युतीत एन्ट्री झाल्यानंतर सर्वाधिक कोंडी शिंदे गटाची झाली आहे. शिंदे गटाला विचारात न घेता भाजपने अजित पवार यांना सोबत घेतल्याचं सांगितलं जात आहे. ज्या अजित पवार यांना कंटाळून शिवसेना सोडली, त्याच अजित पवार यांच्या नेतृत्वात शिंदे गटाला काम करावं लागत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलेला वटवृक्ष तुम्ही तोडलात का? असा सवाल आता शिवसैनिक शिंदे गटाला विचारण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा गट सोबत आल्याने शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाल्याने काल मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. या बैठकीत अनेकांनी आपली नाराजी बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे.
राजीनामा देत नाहीये
आमदारांची ही नाराजी असतानाच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा इतक्या सुरू झाल्या की स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यावर खुलासा करावा लागला आहे. मी राजीनामा देत नाहीये. या बातम्या कोण पसरवत आहे हे मला चांगलं माहीत आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला निराश करणार नाही
माझ्या राजीनाम्याच्या बातम्या कोण प्लांट करत आहे हे मला माहीत आहे. मी राजीनामा देणार नाही. मी 50 आमदारांना निराश करणार नाही. या आमदारांनी संकट काळात मला साथ दिली आहे. त्यामुळे मी त्यांना कधीच निराश करणार नाही, असं शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.
माझच कंट्रोल
2024मध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे. अजितदादा पवार आपल्यासोबत आल्याने चिंता करण्याचं कारण नाही. कारण मुख्यमंत्रीपद अजूनही माझ्याकडे आहे. आणि सरकारवर माझच कंट्रोल आहे. अजित पवार यांना सरकारमध्ये घेणं हा राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वगळून ही युती झाली आहे. इथे घराणेशाहीला थारा नाही, असं शिंदे म्हणाले.
मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करा
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले आहेत. विकास कामांवर ध्यान केंद्रीत करा. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दर 15 दिवसाला म्हणजे महिन्यातून दोन वेळा आमदारांना भेटण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा आयोजित करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच काहीही अडचण आली तर आमदारांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
तीन निर्णय
१. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पाच आमदारांची निरीक्षक म्हणून नियुक्ती
२. दर 15 दिवसाला म्हणजे महिन्यातून दोनदा आमदारांना भेटणार
३. निवडणुकीवर मंथ करण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा घेणार
अजित पवार युतीत ही राजकीय गरज
मी आजही मुख्यमंत्री आहे. उद्याही असणार आहे. अजित पवार सरकारमध्ये आले असले तरी सरकारवर माझं पूर्णपणे नियंत्रण आहे. अजितदादा आल्याने तुम्ही काहीही चिंता करू नका. अजित दादा युतीत येणं ही राजकीय सोय आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादी आपल्यासोबत आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
50 आमदार निवडून आणू
दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीत 50 आमदार निवडून आणण्याचं टार्गेट ठेवा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात लोकसभेच्या 45 जागा निवडून आणण्याचं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं टारगेट असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं.











