शरद पवारांची मोहीमच ठरली; त्या ६ बंडखोरांचीच कोंडी करणार, असा करणार असेल महाराष्ट्र दौरा

0

विश्वासू सहकारी छगन भुजबळ यांनीही अजित पवार यांना बंडात दिलेली साथ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे अजित पवारांसह बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार राज्याचा दौरा करणार असून, त्याची सुरुवात ते छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकपासून करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच याबाबतची घोषणा केली आहे. येवल्यासह सहा बंडखोरांच्या मतदारसंघामध्ये सभा घेऊन त्यांची कोंडी करण्याची तयारी पवारांनी केली आहे.

अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बंड करून स्वत:सह नऊ जणांच्या पदरात मंत्रिपद पाडून घेतले. अजित पवार यांच्या या कृतीमुळे राज्याच्या राजकारणाची दिशाच बदलली असून, शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून आमदारांवर कारवाई केली जात आहे. पवारांनी या सर्वांची हकालपट्टी करतानाच, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. याविरोधात जनतेच्या न्यायालयातही जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांपेक्षा भुजबळांची बंडखोरी पवारांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. तिकडे जाऊन माहिती कळवतो असे सांगून गेलेल्या भुजबळांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतल्याचा खुलासा खुद्द पवार यांनीच केला आहे. त्यामुळे या सर्वांचा बंदोबस्त करण्याचा विडा पवारांनी उचलला असून, या दिग्गजांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभांचा धडाका लावणार आहेत. त्याची सुरुवात पवार भुजबळांचा ‘होल्ड’ असलेल्या नाशिकमधून करणार आहेत. नाशिक, नागपूर, सोलापूर आदींसह महत्त्वाच्या जिल्ह्यांचा दौरा शरद पवार करणार असल्याचे म्हणाले आहेत. शरद पवार हे दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले असून, नाशिकसह येवल्यातही ते जाणार आहे. ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भुजबळांसह जिल्ह्यातील आमदारांचीही ते कोंडी करणार आहेत.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

धडा शिकवण्याचा निर्धार

नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले असून, त्यात भुजबळ येवल्यातून, सरोज अहिरे देवळाली, अॅड. माणिकराव कोकाटे सिन्नर, दिलीप बनकर निफाड, नरहरी झिरवाळ दिंडोरीतून तर नितीन पवार हे कळवणमधून निवडून आले आहेत. हा सगळा पट्टा शरद पवार यांना मानणारा आहे. त्यामुळे सर्वाधिक सहा आमदार असून एकही आमदार सध्या शरद पवारांसोबत नाही. त्यामुळे पवारांनी आता या सर्वांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला असून, या सहा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची दुसरी फळी उभी केली जाणार आहे. त्यामुळे भुजबळच नव्हे तर, या पाचही आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न आगामी काळात होणार आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

शिंदे कुणाला संधी देणार?

राज्यातील जनता शरद पवारांच्या पाठिशी असून, ते स्वत: जनतेत जाऊन संवाद साधणार आहेत. त्याची सुरुवात ते नाशिकमधून करणार आहेत. त्यानंतर बीड, अहमदनगर, नागपूर, सोलापूर, पुण्यासह इतर जिल्ह्यांत दौरा करणार आहेत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.