मुंबईः राज्य सरकारला आज वर्षपूर्ती झालेली आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच गायब झाल्याचं दिसून येत आहे. ‘देवा भाऊ सुपरफास्ट’ अशी जाहिरात काढण्यात आलीय. शिवसेनेत फूट पडून ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. नाट्यमय घडामोडी होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे युती सरकार सत्तेवर आले. अनेक चढ-उतारांचा सामना करत या सरकारला आज (ता. ३०) एक वर्ष पूर्ण झालेलं आहे.






काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे लोकप्रियतेमध्ये नंबर एक आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अशी जाहिरात मुद्रीत माध्यमांमधून प्रसिद्ध झाली होती. त्या जाहिरातीवर टीका झाल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून दुसरी जाहिरात काढण्यात आली होती. त्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी कालच संताप व्यक्त केला होता. प्रत्येक पक्षात कमी डोक्याचे लोक असतात, तशी जाहिरात काढणं मुर्खपणाच होता, असं फडणवीस मुलाखतीत म्हणाले होते.
आज सरकारला वर्षपूर्ती झाल्यानिमित्त भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जाहिरातीमधून एकनाथ शिंदे गायब आहेत. जाहिरातीमध्ये राज्यात १ लाख २० हजार रोजगाराच्या संधी आणि ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता दिल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटा आहे. तर वरच्या भागात नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करुन ”देवा भाऊ सुपरफास्ट? शिंदे कुठे गेले? ते सुपर स्लो का? पिक्चर इधर भी बाकी है मेरे दोस्त…” असं ट्वीट केलं आहे.
त्यावरुन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध पेटेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रियतेच्या मुद्द्यावरुन सरकारमध्येच अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.










