जिल्ह्यातील मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रमाची यंदाही अंमलबजावणी होणार आहे. त्यात आधीच्या इयत्तांमधील महत्त्वाच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृतिपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत.
दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी, तर सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा समावेश आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी सेतू अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या विषय आणि इयत्तानिहाय क्षमता साध्य होण्यासाठी गेली दोन वर्षे ऑनलाइन पद्धतीने सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली.
नंतर केलेल्या राज्यव्यापी अभ्यासात हा अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आल्याने शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्येही अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाले. या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय मराठी, ऊर्दू माध्यमाच्या शाळांसाठी सेतू अभ्यासक्रम छापील स्वरूपात तयार करण्यात आला आहे.
वेळापत्रक असे
अन्य व्यवस्थापनाच्या शाळांसाठी हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार हा अभ्यासक्रम शाळा करू शकतात, असेही निर्देशात नमूद आहे. सेतू अभ्यासक्रम अंमलबजावणी वेळापत्रक असे : ३० जून ते ३ जुलै : पूर्वचाचणी, ४ जुलै ते २६ जुलै : वीस दिवसांचा सेतू अभ्यास, २७ ते ३१ जुलै : उत्तर चाचणी.
सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका विद्यार्थिकेंद्रित आणि कृतीकेंद्रित, अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे.
विषयनिहाय कृतिपत्रिका विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील अशा प्रकारे नियोजन देण्यात आले आहे. त्यानुसार शिक्षकांनी कृतिपत्रिका विद्यार्थ्यांकडून सोडवून घेणे आवश्यक आहे. अभ्यास पूर्ण झाल्यावर शिक्षकांनी त्या इयत्तेची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमातून सुरू राहावे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील नुकसान भरून काढण्यासाठी शैक्षणिक २०२१-२०२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती.
सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आला. त्यात सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळाले. त्यामुळे यंदाही त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.