कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेटसमुळं गेल्या दोन दिवसांपासून तणावाचं वातावरण होतं. आज अनेक हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदला काही प्रमाणात हिंसक वळण लागलं. त्यामुळं शहरात दगडफेकीच्या घटनाही घडली. यापार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये शांतता बैठक घेतली होती. ही बैठक नुकतीच संपली असून यात काय चर्चा झाली याची माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, “शांतता बैठकीत सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. तसेच सर्व वरिष्ठ नेते आणि सर्व समाजाचे लोकही या बैठकीला हजर होते. कोल्हापुरात शांतता आणि सद्भाव राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाची शपथ घेण्यात आली”
दरम्यान, कोल्हापूरमध्ये आज (बुधवार) शहर बंद दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदुत्ववादी संघटनांनी या बंदच आवाहन केलं होतं. तसेच बंद असतानाही तरुण मोठ्या प्रमाणावर शिवाजी चौकात जमले होते, या ठिकाणी काही ठिकाणी दगडफेकही झाली. एकूणच शहरात तणावाचं वातावरण असल्यानं सध्या इथली इंटरनेटसेवाही तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.