पवार कुटुंब आणि विखेंच्या प्रवरागनगरचा तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुना संबंध आहे. पण मध्यंतरीच्या काळात त्यांच्यात राजकीय संघर्ष सुरु झाला तो १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत. आता पुन्हा हे दोन्ही कुटुंब एकत्र येत असल्याचे चित्र आहे. दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदारांनी अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः कर्जत-जामखेड मतदारसंघात उघड युतीचा झेंडा हाती घेतला आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.
राष्ट्रवादीच नेते, आमदार रोहित पवार आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे एकाच व्यासपीठावर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. विखे विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष जगजाहीर आहे, दोन्ही घराणे ऐकमेकांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, पण हे चित्र आता बदलत असल्याचे चित्र आहे. दोन्ही नेत्यांमध्ये छुपी युती आहे अशी चर्चा मागील तीन वर्षांपासून मतदारसंघात होती. नुकतेच माजीमंत्री भाजप आमदार राम शिंदे यांनीही विखे पुत्रांवर थेट निशाणा साधल्याचे आणि त्यात दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समेट करावा लागल्याचे दिसून आले.
देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला आठवडा उलटत नाही तोच आज (2 जून) रोजी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड यांनी जामखेडमधील येथे आयोजित केलेल्या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराला भाजपा खासदार डॉ.सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमात रोहित पवारांनी भाषणही केली. या भाषणात रोहित पवारांनी खासदार डॉ.सुजय विखेंचे कौतुकही केले. एकुण घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहता विखे – पवार यांच्यातील उघड युतीचे दर्शन आता राज्याला झाले आहे. भाजपा खासदार डॉ.सुजय विखे-पाटील हे भाजपा नेते आमदार प्रा.राम शिंदे यांना अडचणीत आणणारी भूमिका घेत आहेत का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
चर्चा पुन्हा सुरू
बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांचा संघर्ष गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिला जात आहे. मात्र, जामखेड आणि कर्जतमध्ये याच पवार कुटुंबांना विखे यांनी मदत केल्याचा आरोप भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी केला आहे, त्यामुळे 40 वर्षांचा संघर्ष संपला की काय? याबाबत चर्चा झाल्या असल्या तरी विखे पिता-पुत्र भाजपात असल्यामुळे आणि भाजपाच्या आमदारांनी आरोप केल्यामुळे या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद १९९१च्या लोकसभा निवडणुकीत विकोपाला गेला. अहमदनगर मतदारसंघात यशवंतराव गडाख हे काँग्रेसचे उमेदवार होते. तर बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी न मिळाल्यानं ते गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. पण यशवंतराव गडाख हे अटीतटीच्या लढतीतून निवडून आले.