३५०व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारकडून रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने अनेक दिग्गज नेत्यांनी रायगडावर हजेरी लावली होती. यानिमीत्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील कुटुंबासब रायगडावर जात महाराजांनी अभिवादन केलं. राज ठाकरेंनी रायगडावरी फोटो शेअर करत याबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे.






राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात की…
“३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर जाऊन मी माझं कुटुंब आणि माझ्या सहकाऱ्यांनी महाराजांना अभिवादन केलं.
महाराजांच्या ३०० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने तेंव्हा शिवतीर्थावर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवसृष्टी आणली होती. तेंव्हा मी स्वर्गीय बाळासाहेबांसोबत जवळ जवळ रोज जायचो. त्यावेळेला संध्याकाळी रोज ७ वाजता शिवराज्याभिषेक सोहळा व्हायचा. तो मी दररोज बघायचो आणि तो मला तोंडपाठ झाला होता. तो क्षण होता की छत्रपती शिवाजी महाराज ह्या नावाने माझं आयुष्य व्यापलं, भारावलं, जे अजून ही तसंच आहे आणि आयुष्यभर हे मंतरलेपण राहील.
मी अनेकदा रायगडावर गेलो आहे. प्रत्येकवेळी तिथे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. पण आज जे मी अनुभवलं, ते विलक्षण होतं.
मी नेहमी म्हणतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हा सामान्यांनी घडविलेला असामान्य इतिहास आहे. मी काल म्हणलं तसं ते एक युगप्रवर्तनच होतं. आणि शिवराज्याभिषेक हा त्या युगप्रवर्तनातील अतिशय महत्वाचा टप्पा होता. ह्या हिंद भूमीच्या स्वाभिमानासाठी, स्वत्वासाठी या रयतेच्या राजाला राजसिंहासनाची, राज्याभिषेकाची नितांत गरज होती… हा सुवर्णक्षण पुढची अगणित वर्ष ह्या हिंद भूमीला प्रेरणा देत राहील इतकी ताकद ह्या घटनेत आहे.
तेव्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष मनामनात घुमू दे आणि त्यांचे विचार आपल्या मराठी जनांच्या धमण्यामंधून वाहू देत, हीच इच्छा आणि हीच आजच्या दिवशी शिवचरणी प्रार्थना.”
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.










