मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी एक बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्य वन्यजीव मंडळाने १४ हजार २४१ झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एकूण चार प्रकल्पांसाठी ही झाडे तोडण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या गॅस पाईपलाईनसाठी काही झाडं तोडण्यात येणार आहेत. राज्य वन्यजीव मंडळाची बैठक २ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली होती. या बैठकीत निर्णय गेण्यात आला नव्हता. तिकडे केंद्र सरकारला मात्र गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (GAIL) मंजुरीसाठी तात्काळ मंजुरी हवी आहे. त्यामुळे एका महिन्यात ही दुसरी बैठक घेण्यात आली.
GAILची गॅस पाईपलाईन बोर आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या कॉरिडॉरमधून जाते. नागपूर ते मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंत द्रवरुप नैसर्गिक वायू पाईपलाईनच्या माध्यमातून वाहून नेला जाणार आहे. ३२० किलोमीटरच्या अंतराच्या लाईनपैकी २४ किलोमीटर वनक्षेत्र आहे. येथील झाडे तोडण्यात येणार आहेत. वन्यजीव मंडळाने २२० केव्हीची ठाणे सॅटेलाईट लाईन मंजूर केली आहे. जी ठाण्याच्या खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या आत ६२ किलोमीटरमधून जाते. यासाठी ४३९ झाडे तोडण्यात येणार आहेत.
यासह राज्यातील बामणी गावापासून ते तेलंगणापर्यंत राष्ट्रीय महामार्ग 930 डी च्या रुंदीकरणासाठी ६ हजार ८०५ झाडे तोडली जाणार आहेत. ताडोबा-अंधारी-कन्हारगाव-इंद्रावत-कवळ या टायगर कॉरिडॉरमधून हा मार्ग जातो. तसेच ताडोबा-अंधारी-कवळ भागातील व्याघ्र कॉरिडॉरमधून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग 353 बी च्या रुंदीकरणासाठी 5,140 झाडे तोडली जाणार आहेत. या गंभीर प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.