लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवारांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय. त्यातूनच त्यांनी आता महाराष्ट्रातून पहिला उमेदवार जाहीर केला आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ वासियांना केलं आहे. शरद पवार हे सांगलीच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं.
आमदार सुमनताई यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या, आम्ही सर्व प्रश्न सोडवू असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा 25 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यानंतर आता शरद पवारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तासगावमधून सुमनताई पाटील या सध्या आमदार असून त्या आधी स्व. आर आर पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे.
भाजपच्या डोक्यातील सत्ता लोकांनी उतरवली
भाजपवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, “लोकसभेच्या निवडणुकीवेळी काहीजणाच्या डोक्यात सत्ता गेली होती, डोक्यात गेलेली सत्ता उतरवायची असेल तर लोकांना सोबत घेतलं पाहिजे. आपण लोकसभेमध्ये दहा पैकी आठ जागा निवडून आणल्या. सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना संधी दिली आणि आता ते लोकसभेत जाऊन बसले आहेत.” भाजपकडून 400 च्या खाली जागा येणार नाही असे काही वाटेल ते सांगण्यात येत होतं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यावर नरेंद्र मोदींनी सातत्याने टीका केली, पण मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही असं शरद पवार म्हणाले.
राज्यकर्ते कुणासाठी काम करतात?
चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभेत काहीही झालं तरी सत्ता परिवर्तन करायचं आहे. आजचे राज्यकर्ते नेमके कोणासाठी काम करतात हे समजत नाही. सक्षम असणाऱ्या कारखान्यांना मदत करण्यात येते, परंतु दुष्काळी भागातील बदल करण्याच्या मार्गावर असणाऱ्या कारखान्यांना मदत होत नाही. अहमदनगरच्या एका कारखान्याला 150 कोटी रुपये दिले, सातारा जिल्हा येथे एका कारखान्याला 350 कोटी रुपये दिले. पण दुष्काळी भागातील कारखान्यांना मदत केली जात नाही.