अदानींनी गमावलेली बहुतांश संपत्ती मिळवली परत, श्रीमंतांच्या यादीत घेतली मोठी झेप

0
2

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमुळे उद्योगपती गौतम अदानी यांचा उद्योग समूह पूरता हादरला होता.अदानी समुहातील अनेक कंपन्यांचे शेअर अभूतपूर्वपणे कोसळले होते. तसेच गौतम अदानी हे श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरून ३५व्या क्रमांकांपर्यंत घसरले होते. मात्र गेल्या काही दिवसांत चित्र पूर्णपणे बदललं असून, अदानी समुहाचे अनेक शेअर अप्पर सर्किटला गवसणी घालत आहेत. तसेच समुहाचा कंबाइंड मार्केट कॅप ९ लाख रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. त्याचा फायदा गौतम अदानी यांनाही झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून अदानी जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये वेगाने पुढे जात आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या माहितीनुसार अदानी ५४ अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह जगभरातील श्रीमंतांच्या यादीमध्ये २२ व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. तसेच त्यांच्याबाबत आलेल्या सकारात्मक वृत्तांमुळे कंपनीच्या शेअरमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

बुधवारी अदानींच्या नेटवर्थमध्ये १.९७ अब्ज डॉलर एवढी वाढ झाली. तसे पाहिल्यास अदानींच्या नेटवर्थमध्ये यावर्षी ६६.५ अब्ज डॉलर एवढी घट झाली आहे.समुहाच्या सर्व दहा लिस्टेड कंपन्यांच्या शेअरमध्ये बुधवारी तेजी आली होती. पाच शेअरनी अप्पर सर्किटला गवसणी घातली होती. समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचे शेअर सुमारे ३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले होते. तर पाच शेअर पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहोचले. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश आहे.दरम्यान, जगातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन ११ व्या क्रमांकावर कायम आहेत. बुधवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये १७ कोटी डॉलर एवढी वाढ झाली. त्याबरोबरच ती ८३.६ अब्ज डॉलरवर पोहोचली. यावर्षी अंबानींच्या नेटवर्थमध्ये ३.५२ अब्ज डॉलर एवढी घट झाली आहे. फ्रान्सचे उद्योगपती बर्नाड आरनॉल्ट हे १८७ अब्ज डॉलरच्या नेटवर्थसह या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. एलन मस्क दुसऱ्या, जेफ बेजोस तिसऱ्या, बिल गेट्स चौथ्या, वॉरेन बफे सहाव्या, स्टीव्ह
बाल्मर सातव्या, लॅरी पेज आठव्या आणि कार्लोस स्लिम आणि सर्गैई ब्रिन दहाव्या क्रमांकावर आहेत.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली