महाड दि. २६ (रामदास धो. गमरे) भारतीय संविधानाच्या आधी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कोकणस्थ बांधवांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी १९४१ साली बौद्धजन पंचायत समितीची स्थापना केली व समितीचा कारभार व्यवस्थित व पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी समितीला घटना बहाल केली. याच घटनेच्या अनुषंगाने लोकशाही मार्गाने दर पाच वर्षांने बॅलेट पेपरवर निवडणुका लढवून लोकमतदानातून निवडून आलेल्या उमेदवारांमधून २१ जणांचे व्यवस्थापन मंडळाची निवड केली जाते, शासनाची जशी वेगवेगळी खाती आहेत त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समितीच्या अर्थ समिती, निवडणूक समिती, संस्कार समिती, विवाह समिती, शिक्षण समिती, न्यायदान समिती अश्या पारदर्शक पद्धतीने कामकाज करणाऱ्या वेगवेगळ्या सोळा समित्या आहेत, बौद्धजन पंचायत समिती ही संघटनात्मक कामकाजावर जास्त भर देऊन नवोदित शिशूच्या जन्मापासून ते मनुष्याच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमापर्यंत सर्व सोपस्कार समितीच्या माध्यमातून केले जातात आणि यातूनच कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन कार्यकर्ते घडवले जातात म्हणूनच बौद्धजन पंचायत समिती जणू कार्यकर्ते निर्मितीची फॅक्टरी आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःकरता नाही तर मानवी हक्कांसाठी पाण्याला आग लावून महाड भूमीत क्रांती केली आणि आम्ही देखील मानव आहोत हे जगाला ठणकावून सांगितले. २५ डिसेंबर १९२७ साली मनुस्मृती दहन करून गुलामीच्या बेड्या तोडून स्त्री पुरुषांना व तळागाळातील सर्वच आबालवृद्धांना मुक्ती दिली तोच आपला खरा स्वतंत्र दिन आहे असे मी मानतो. बाबासाहेबांनी लावलेली ही क्रांतीची ज्योत अशीच आपण धगधगती ठेवून ती पुढील पिढीकडे सुपूर्द करायची आहे, तेव्हा बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसात करून आपल्या मुलांना शैक्षणिकदृष्टीने सुशिक्षित करून त्यांना आदर्श नागरिक घडवायचं आहे” असे प्रतिपादन आनंदराज आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन तथा मानवमुक्ती दिनाच्या ९८ व्या वर्धापनदिनानिमित्त महाड क्रांतिस्तंभाजवळ उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना केले.






बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी ९८ वा मनुस्मृती दहन तथा मानवमुक्ती दिन सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाड येथे क्रांतिस्तंभाजवळ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते चौकाचौकात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करीत त्यांची रॅली महाड क्रांतीस्तंभाजवळ दाखल झाली तिथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व सचिव मनोहर बा. मोरे यांनी आपल्या गोड व सुमधुर वाणीने पूजाविधी संपन्न केला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे यांनी लाघवी भाषाशैलीसह आपल्या पहाडी व रुबाबदार आवाजात केले.
अध्यक्षीय भाषणात पुढे आनंदराज आंबेडकरांनी पुढे “सामाजिक संगटनाच्या आणि नगरपालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या बांधवांची याठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा केली नाही असे दिसत असून त्यांची गैरसोय झाल्याचे माझ्या पाहणीत निदर्शनास आले आहे म्हणून यापुढे माझ्या येणाऱ्या बांधवांसाठी बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने भोजनदान व इतर सुविधा देण्यात येतील” असे नमूद केले. तसेच उपसभापती विनोद मोरे यांनी मनुस्मृती दहन व मानवमुक्ती दिनाचे महत्व पटवून देत असताना “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोण गावात आले तिथून आंबा बोटीने ते तासगावला पोहोचले व पुढे बैलगाडीने ते याठिकाणी दाखल झाले म्हणून येणाऱ्या शतकमहोत्सवाची सुरवात बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने येथे आगमन केले त्यानुसार आपण तिथून सुरवात करावी” असे विचार आपल्या भाषणात व्यक्त केले. कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आपल्या भाषणात “भैय्यासाहेबांनी क्रांतिस्तंभाची पायाभरणी केली व त्याचे उद्घाटन २५ डिसेंबर १९८६ साली वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण यांनी केले, सदर क्रांतिस्तंभ हा आपल्या मानवमुक्तीची निशाणी आहे” असे नमुद केले. माजी कार्याध्यक्ष व पतपेढी अध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, महिला आघाडी उपाध्यक्षा सुजाताताई पवार, क्रांतिभूमीचे सुपुत्र भगवान तांबे आदींनी आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, चिटणीस यशवंत कदम, अनिरुद्ध जाधव, श्रीधर जाधव, रवींद्र शिंदे, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, गोविंद तांबे, तुकाराम घाडगे, विलास जाधव, गजानन तांबे, अशोक मोहिते, अतुल साळवी, सदानंद येलवे, तुकाराम घाडगे, बौद्धाचार्य कासारे, रत्नागिरी जिल्हा गटप्रतिनिधी उत्तम जाधव, रायगड जिल्हा गटप्रमुख विकास गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, श्रीधर नाना जाधव, एम. एस. कासारे, सुशीलताई जाधव, अंजलीताई मोहिते, व्यवस्थापन मंडळ, महाड, रत्नागिरी चिपळूण, पेण, पनवेल, अलिबाग, रोहा, म्हसळा या प्रत्येक तालुक्यातील तालुका कमिटी, त्यांचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला भीमसागर याठिकाणी उपस्थित होता, सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.













