महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन मित्रपक्षांनी पुणे महापालिकेत युती करून निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असला, तरी भाजपने जागा वाटपावरून घेतलेल्या भूमिकेने शिवसेना (शिंदे) पक्षापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांसाठी जागा देण्याची भूमिका भाजपने घेतली असून, भाजपचे चारही नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागांमध्ये जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाची अवघी एक जागा निश्चित मानली जात आहे.






शिवसेनेला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्राबल्य असलेल्या आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार उभे असलेल्या प्रभागांमध्ये लढण्यासाठी जागा देण्याची तयारी भाजपने दर्शविली असल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे.
भाजप-शिवसेना युतीची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्या बैठकीत शिवसेनेला २५ ते २६ जागा देण्यासाठी भाजप तयार झाली आहे. मात्र, त्या बैठकीत भाजपने घेतलेल्या भूमिकेने शिवसेनेपुढे प्रश्न उभा राहिला आहे. शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांना जागा देण्यास भाजपने सहमती दर्शविली आहे. मात्र, भाजपचे चारही नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागांमध्ये जागा मिळणार नसल्याची भूमिका बैठकीत भाजपने घेतल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एक काँग्रेसमध्ये, पाच भाजपकडे गेले आहेत. तीनजण शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाकडे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे एकच नगरसेवक आहेत. भाजपच्या जागा वाटपाच्या भूमिकेनुसार ही एकच जागा निश्चित मानली जात आहे.
भाजपचे चारही नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागांमध्ये काही जागा मिळतील, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. मात्र, त्याबाबत भाजपची नकारघंटा असल्याने जागा वाटपात अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’ आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार असलेल्या प्रभागांमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षासाठी जागा सोडण्यास तयार असल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपला यश मिळू शकणार नाही, याचा अंदाज असलेल्या या प्रभागांमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाला जागा देऊन अजित पवार यांची ‘राष्ट्रवादी’, शिवसेना (ठाकरे) या तीन पक्षांमध्ये लढत घडवून आणण्याची रणनीती भाजपने आखली आहे. युतीच्या पहिल्या बैठकीत भाजपच्या एका नेत्याने ही भूमिका मांडली. त्यास शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी दर्शविली. मात्र, ही प्राथमिक चर्चा असल्याने दुसऱ्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा करण्याचे ठरवून बैठक आटोपण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
धंगेकरांना किती जागा देणार?
जागा वाटपात माजी आमदार, शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ‘कसबा गणपती- कमला नेहरू हॉस्पिटल’ या प्रभागात धंंगेकर यांना किती जागा द्यायच्या, यावरून वादाची ठिणगी पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. धंगेकर हे चिरंजीव प्रवण यांना निवडणुकीसाठी उभे करण्याची तयारी करत आहेत. या प्रभागात ते दोन जागा शिवसेनेला आणि दोन भाजपला देण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यास भाजपकडून विरोध केला जाणार आहे.
गेल्या निवडणुकीत हा प्रभाग ‘कसबा पेठ-सोमवार पेठ’ असा होता. तेव्हा या प्रभागात भाजपचा एक नगरसेवक निवडून आला. या प्रभागातून धंगेकर हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडून आले होते, तर काँग्रेसच्या सुजाता शेट्टी या विजयी झाल्या होत्या. उर्वरित एक जागा ही तत्कालीन शिवसेनेला मिळाली होती. तेथून पल्लवी जावळे या निवडून आल्या होत्या. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता नवीन ‘कसबा गणपती- कमला नेहरू हॉस्पिटल’ या प्रभागात भाजपनचे निवडणूक प्रमुख, माजी सभागृह नेते गणेेश बीडकर हे उमेदवार असणार आहेत. जावळे या वेळी भाजपकडून उमेदवारीसाठी दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने दोन जागांवर आग्रह धरल्यास धंगेकर हेदेखील दोन जागांसाठी आग्रही राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थीतीत धंगेकर यांना किती जागा द्यायच्या, यावरून वाद होण्याची चर्चा सुरू झाली आहे.













