वारजे बदलतंय! शुभारंभ आणि संभ्रम एकाचवेळी लागलेल्या फ्लेक्सचीच चर्चा; भाजपची ‘प्लॅन बी’ चाचपणी?

0

खडकवासला विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला(फक्त विधानसभेपुरता) तरीही वारजे माळवाडीमध्ये आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘प्राबल्य’च असून सध्या सुरू असलेल्या प्रवेशाच्या काळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ‘वारजे बदलतंय!’चा हुकमी पत्ता भाजप गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहे? विद्यमान विजयी चौकार मारलेल्या आमदारांचा असलेला प्रखर विरोध अन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ‘पैलवान’ गटातून वाढत चाललेली ‘सलगी’ या गोष्टींचा विचार करता भारतीय जनता पक्षाच्या वतीने वारजे माळवाडी काबीज करण्यासाठी प्लॅन बी तयार करण्यात आलेला आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. वारजे माळवाडी परिसरामध्ये सध्या इच्छुकांचे पेव(अनाधिकृत फलकांचे) फुटले असून सर्वत्रच इच्छुकांचे फलक फुटा फुटावर…. एका खांबावर पाच पाच! अशाप्रकारे निवडणुकीचा रंग चढत आहे. त्यातच माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या वतीने संपूर्ण प्रभागात ‘आम्ही येतोय जनतेसाठी प्रभाग क्रमांक 32 च्या हितासाठी…..’ फलक लावून प्रचारात आघाडी घेतलेली असताना अचानक मध्यरात्री वारजे माळवाडी चा मुख्य चौक असलेला तिरंगा झेंडा चौकात ‘मी येतोय जनतेच्या आग्रहासाठी’ अशा आशयाचा काही काळासाठी फलक लावण्यात आला होता. अत्यंत हुशारीने काही क्षणात हा फलक फाडून गायब करण्यातही आला परंतु माजी नगरसेवकाच्या एकाच वेळी लागलेल्या दोन विभिन्न फलकांमुळे भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले.

अधिक वाचा  पुण्यात महायुतीची ताकद आणखी वाढली; पर्वती, खडकवासला, धायरी, वडगाव शेरीचे पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर

वारजे माळवाडी परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून ज्या चेहऱ्याभोवती संपूर्ण प्रभागाची रणनीती आखण्यात आलेली असतानाच शेवटच्या क्षणापर्यंत ‘घरंदाज राजकारणी’ भारतीय जनता पक्षाच्या हाताला लागत नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘प्लॅन बी’ सुरू केला आहे की काय? कदाचित घरंदाज राजकारणी घराण्याला हा संकेत देण्यात आला आहे का? का हा केवळ पब्लिसिटी फंडा आहे? पुणे महापालिकेचा गड जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरभर तयारी आणि आखणी केली जात असताना वारजे माळवाडी भागात मात्र भारतीय जनता पक्षाला समाधानकारक खात्रीलायक स्थानिक चेहरे हाताशी नसल्याने 100% पक्षप्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्रवारी रात्री उशिरा येथील गार्डन सिटीजवळ तिरंगा झेंडा चौक शेजारी ‘मी येतोय जनतेच्या आग्रहासाठी, खडकवासल्याच्या जनतेच्या सेवेसाठी’ अशा आशयाचे मोठे बॅनर लागले. रात्री उशिरा हे बॅनर लागले! सकाळी लवकर फाडले! काही वेळाने काढले! परंतु विशेष म्हणजे सर्वत्र याचे फोटो व्हायरल देखील झाल्याने दिवसभर या फाडलेल्या बॅनरचीच चर्चा रंगली होती.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

वारजे माळवाडी परिसरात सलग विभिन्न आशयाचे दोन फलक फक्त ‘पब्लिसिटी स्टंट’साठी लावण्यात आले की प्रमुख दावेदार उमेदवाराचे ‘प्रतिमा भंजन’ करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याबाबत वारजे पोलिस ठाण्यात सकाळी काही जण असा बॅनर कोणी लावला याची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची विनंतीही पोलिस ठाण्यात केली. मात्र, सध्या सीसीटीव्ही मेंटेनन्स सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मुळात एकाच व्यक्तीचे दोन विभिन्न भुमिका असलेले फलक लावणे मागे कारण काय? याबाबत अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल होणार का? अनधिकृत फलकांबाबत पुणे महापालिका कोणता निर्णय घेणार? याबाबत सविस्तर लेखी तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल न झाल्याने चाणक्य आणि निरपक्ष असलेल्या वारजे माळवाडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांने मात्र घडलेल्या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले. मात्र, याबद्दल वायरल झालेले, फाटलेले बॅनर ‘माध्यमां’च्या हाती लागले.

भाजपाच्या नक्की गळाला कोण?

वारजे माळवाडी भागात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढण्यासाठी गेली अनेक वर्ष विभिन्न प्रयोग केले जात आहेत. सर्वात अगोदर माजी नगरसेवक यांना भाजपमय करून सतत कार्यकारणी मध्ये पद अन विद्यमान आमदारांचे खास अधिकार अशी ताकद देण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर शेजारच्या प्रभागामध्ये पराभव स्वीकारलेल्या उमेदवाराला या भागांमध्ये सक्रिय करत घरंदाज घराण्याशी जवळीक वाढवण्याचे प्रयत्नही झाले आहेत परंतु राजकारणात ताकही फुंकून पिणाऱ्या अन् संधीची चाहूल ओळखत पाऊले टाकणाऱ्या याच घराण्याची दिशा अजूनही संभ्रमात असल्याने भाजपच्या वतीने या नवीन ‘वारजे बदलतंय!’ कार्डची चाचपणी आहे? अशी चर्चा सध्या संघ परिवारामध्ये सुरू झाली आहे.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

मुळात वारजे माळवाडी परिसरातील आगामी निवडणुकीमध्ये ‘अनुसूचित जाती’साठी आरक्षित जागा झाल्याने विद्यमान एका महिला नगरसेविकीचे भविष्य अंधारात आहे. राष्ट्रवादीच्या माजी लोकप्रतिनिधींचे गणित पाहता सध्या घड्याळाकडे 3 अन् तर इकडे 1 (सलग दोनदा विधानसभा नशीब आजमावलेले) आहेत. त्यातच एक महिला आरक्षण राखीव झाल्याने एका महिला नगरसेविकेला संधी मिळणार नाही. त्यामुळे सर्वत्र राजकीय गणिताची जुळवाजुळव सुरू असून प्रबळ लढतीसाठी अनुभवी माजी नगरसेवक आपल्या पॅनलमध्ये ठेवण्यास सर्वांची जुळवा जुळवा सुरू आहे. आजच्या तारखेला तिसऱ्या स्थानी असलेल्या भारतीय जनता पक्षाला कोणत्या चेहऱ्याने नवसंजीवनी मिळेल याचे उत्तर मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.