बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सुभेदार रामजी बाबा सकपाळ जयंती महोत्सव संपन्न

0

मुंबई : (रामदास धो. गमरे) बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सुभेदार रामजी बाबा सकपाळ यांचा १७७ वा जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे समितीच्या कार्यालयात कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. सदर प्रसंगी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली, सरचिटणीस राजेश घाडगे यांनी आपल्या पहाडी अत्यंत प्रभावी व लाघवी भाषाशैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना रामजी बाबा मालोजी सकपाळ यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घडविण्यासाठी घेतलेले अपार कष्ट व मेहनत यांचा आढावा घेऊन सर्वांनी रामजी बाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढी घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे नमूद केले.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

अध्यक्षीय भाषणात लक्ष्मण भगत यांनी “रामजी बाबा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, रामजी बाबांचे वडील मालोजी सकपाळ हे ब्रिटिश राजवटीत सैन्यात भरती झाले त्यामुळे रामजी बाबांचे शिक्षण सैनिकी शाळेत पूर्ण झाले मालोजी बाबांना तीन मुलगे व एक मुलगी असे चार अपत्ये होती दोन मुलांनंतर मीराबाई या मुलीचा व १८४८ ला रामजी बाबांचा जन्म झाला त्यांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला तर दुसरा मुलगा व ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून भरती झाला तर रामजी बाबा शैक्षणिक शिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झाले वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचा विवाह भीमाबाईशी झाला ते धार्मिक वृतीचे असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांचे अभंग, दोहे रामजी बाबांना तोंडपाठ होते १८९१ रोजी रामजी बाबा व भीमाबाई यांच्या पोटी भीमराव आंबेडकर या चौदाव्या रत्नाचा जन्म झाला, बाबासाहेबांना घडविण्यासाठी रामजी बाबांनी अपार कष्ट घेतले त्यांच्या शिक्षणासाठी आपलं आयुष्य पणाला लावले व त्यामुळेच बाबासाहेबांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली” असे नमूद करून उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

सदर प्रसंगी अतिरिक्त चिटणीस यशवंत कदम, प्रसिद्धी प्रमुख रमेश जाधव, विश्वस्त प्रकाश जाधव, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, संजय मोहिते, प्रदीप तांबे, निवडणूक अध्यक्ष मिलिंद जाधव व इतर शाखापदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी सरचिटणीस राजेश घाडगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.