पुणे महापालिकेच्या प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्याने शहरात सध्या निवडणुकीचा ‘फिवर’ वाढला असून आरक्षण सोयीचे पडलेल्या इच्छुकांकडून उमेदवारीसाठी जुळवा जुळव सुरू केली आहे. ज्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडले आहे, तेथील बाहुबली इच्छुकांनी कुटूंबातील महिला सदस्यांचे बोर्ड, बॅनर्स सोशल मिडीयात झळकविण्यास सुरूवात केली आहे. इच्छुकांमध्ये ‘पोस्टर लॉन्चची क्रेझ’ सध्या तुफान सुरू असून सर्वत्र प्रभाग क्रमांक आणि चेहरे झळकत आहेत. दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांमध्ये आपले गणित कसे बसवायचे याचे आडाखे बांधत पुन्हा सभागृहात जाण्यासाठी बदललेल्या राजकीय गणितांचा विचार करत इतर पक्षातून संधी मिळविण्य़ासाठी चाचपणी सुरू केली आहे. राजकीय परिपक्वता अन उत्साह असलेल्या अनेकांनी सोशल मिडीयावर थेट प्रचारालाही सुरूवात केली आहे.






पुणे महापालिकेच्या सोडतीनंतर पक्ष कार्यालय, नेत्यांचे कार्यक्रम तसेच सोबत लढण्यासाठी इच्छूक असलेल्या इतर उमेदवारांच्याही भेटी घेण्यास सुरूवात केली आहे. मुळात पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासक नियुक्त झाल्यापासून पुणे महापालिकेत न गेलेले अनेक चेहरे व नव्या राजकीय गणितानुसार निर्माण झालेल्या संधीचा फायदा उठवण्यासाठी अनेक इच्छुकांकडून बुधवारी दिवसभर महापालिकेत प्रभागातील समस्यांची निवेदन घेवून अधिकाऱ्यांची भेट घेत कार्य-अहवालासाठी फोटोसेशनही सुरू केले आहे.
चार सदस्य प्रभाग पद्धतीमुळे तिकिटासाठी या पर्यायाची चाचपणी…..
सर्वसाधारणपणे चार सदस्यांच्या प्रभागात अपक्ष निवडून येणे जिकरीचे असते. त्यामुळे निवडणुकीसाठी राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षाची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक सोपी जाते. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर अनेकांनी आता तिकिटासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी, इच्छुकांकडून तिकिट हव्या असलेल्या पक्षांच्या शहराध्यक्षांशी गुरूवारी दिवसभर संपर्क साधला जात होता. अनेक पक्षांच्या इच्छुकांनी त्यासाठी पक्षाच्या कार्यालयाची पायरी चढत पक्ष कार्यालयात गर्दी केल्याचे पहायला मिळाले.
अनेकजण भाजपकडून लढण्यास इच्छूक असून संधी मिळाली नाही तर राष्ट्रवादी काॅग्रेसकडून तिकिटासाठी चाचपणी केली जात आहे. काही जण राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे नजरेस आले आहे. त्यामुळे, आता प्रभाग आणि आरक्षण सोयीचे पडल्याने तिकिटासाठी चाचपणी सुरू झाली आहे.
लाडक्या बहिणी फ्लेक्सवर झळकु लागल्या….
महापालिकेच्या १६५ मधील ८३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यातच, विद्यमान नगरसेविकांसह अनेक प्रभागामध्ये खुल्या जागांवर महिलांचे आरक्षण पडल्याने अनेक नगरसेवकांची कोंडी झाली असून त्यांना आता निवडणुकीसाठी घरातील महिलांना पुढे करावे लागणार आहे. त्यामुळे राजकारणापासून चार हात दूर असलेल्या इच्छुकांच्या घर कारभारीण फ्लेक्सवर झळकण्यास सुरूवात झाली आहे. कोणाकडून पत्नीला, कोणाकडून आईला तर कोणाकडून मुलींना संधी दिली जाणार असल्याचे या फ्लेक्स वरून लक्षात येते.













