वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय आल्याने फिर्यादी पतीने पत्नीचा खून करून पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी आरोपी पतीने पोलिसांतच पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देत संपूर्ण तपास दिशाभूल करण्याचा बनाव केला. मात्र वारजे पोलिसांच्या तपासाची चक्र वेगाने फिरवली आणि नाट्य उघडे पाडले. बेपत्ता न झालेल्या महिलेचे नाव अंजली समीर जाधव असून, तिचा पती समीर पंजाबराव जाधव (42 रा. शिवणे) याला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. समीरने 28 ऑक्टोबर रोजी वारजे पोलिस ठाण्यात येऊन पत्नी अंजली हरवल्याची तक्रार नोंदवली. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली.






अजून मिळाली का नाही माझी पत्नी? आरोपीकडून सातत्याने विचारणा अन् सगळं उघडं पडलं
समीर याने त्याची पत्नी अंजली ही श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा (शिंदेवाडी) या भागातून अचानक गायब झाली अशी तक्रार नोंदवली होती. सुरुवातीला फिर्यादी समीर यांच्या वागणुकीला ग्राह्य धरून वारजे माळवाडी पोलिसांमार्फत सदरील तपास राजगड पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यासाठी पोलीस प्रक्रिया सुरू झाली. आपण केलेल्या बनावांमध्ये पोलीस यंत्रणा पूर्णपणे गुंतली असल्याची जाणीव झाल्यानंतर फिर्यादी समीरचे वर्तन संशयास्पद वाटू लागले. सुरुवातीला सहज वाटणारा हा गुन्हा तक्रारदार समीर स्वतःच वारंवार पोलीस ठाण्यात हजेरी लावत होता. तो सतत – “अजून मिळाली का माझी पत्नी?” अशी विचारणा करत असल्याने पोलिसांना शंका आली. वारजे माळवाडी पोलिसांनी संशय बळवल्यानंतर सांगितलेल्या ठिकाणी जाऊन CCTV फुटेज तपासले; पण अंजली त्या भागात कुठेही दिसत नव्हती. त्यातच फिर्यादी समीरच्या बोलण्यामध्ये विसंगती लक्षात आल्याने त्याची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली. अखेर पोलिसांचा दबाव वाढताच समीरने संपूर्ण कट कारस्थानाची कबुली दिली.
समीरने कबुली जबाबात सांगितले की, अंजलीचे सतेज पाटील नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. तिच्या मोबाईलवरील चॅट्स पाहून तो वेळोवेळी संतापत असे. घरगुती वाद वाढत चालल्याने एक महिन्यांपूर्वीच पत्नीचा खून करण्याचा निर्णय घेतल्याचे समीरने म्हटले. खून करण्यापूर्वी त्याने एक गोडाऊन 18 हजार रुपये मासिक भाड्याने घेतले. तिथे लोखंडी पेटी, पेट्रोल आणि लाकूड साठवून ठेवले होते. 26 ऑक्टोबरला समीरने पत्नीला “ड्राइव्हला” नेण्याच्या बहाण्याने घराबाहेर काढले. हुंडाई आय 10 कारने दोघे खेड शिवापूर जवळील मरीआई घाट येथे गेले. तिथून परतताना ब्राऊनस्टोन हॉटेलमध्ये थांबले, भेळ घेतली आणि थेट भाड्याच्या गोडाऊनमध्ये गेले. तिथे दोघे बसले असताना समीरने अचानक पत्नीचा गळा दोन्ही हातांनी आवळला. अंदाजे दहा मिनिटांत अंजलीचा मृत्यू झाला. मृतदेह त्याने आधीपासून ठेवलेल्या लोखंडी पेटीत ठेवून त्यावर पेट्रोल ओतले आणि अत्यंत निर्दयीपणे जाळून टाकले. मृतदेहाची जाळलेली राख नदीपात्रात टाकली. मृतदेह नष्ट करण्यासाठी वापरलेली लोखंडी पेटीही स्क्रॅपमध्ये विकून टाकली.
वारजे पोलिस ठाण्यात समीरवर भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (खून), 201 (पुरावे नष्ट करणे) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास राजगड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आत्ता वारजे माळवाडी पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून रायगड पोलिसांच्या वतीने ही पुन्हा एकदा पोलिशी खाक्या दाखवला जाण्याची शक्यता आहे.













