उजनीने सर्व रेकॉर्ड मोडले! भीमानदी ३ महिन्यात ३ पूर; १११ दिवसांत १५२TMC विसर्ग; ९ कोटींची वीजनिर्मिती

0

परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यासह उजनीच्या पाणलोट क्षेत्रात धुमाकूळ घातला असून उजनी धरणात मोठा विसर्ग जमा होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आता जेवढा विसर्ग येईल तो भीमा नदीतून सोडून दिला जात आहे.त्यामुळे २०२० नंतर यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या उजनीतून भीमा नदीत एक लाख क्युसेकचा विसर्ग सुरू असून वीर धरणातूनही साडेसात हजाराचा विसर्ग सुरू आहे.

उजनीतून सोडलेले पाणी आणि वीर धरणातील पाण्यामुळे पंढरपूरजवळील भीमा नदी पात्रात मागच्या महिन्यात एक लाख ८० हजारांहून अधिक क्युसेकचा विसर्ग होता. भीमा नदीत पूर आल्याने पंढरपुरात चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती, ज्यामुळे गोपाळपूर येथील पूल पाण्याखाली गेला आणि चंद्रभागा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील शेकडो कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागले होते. याशिवाय जुलै, ऑगस्ट आणि आता सप्टेंबर अशा तीन महिन्यांत काही दिवसांच्या अंतराने भीमा नदी पात्र ओसंडून वाहिले आहे. लहान-मोठे तलाव, नद्यांची पात्र देखील ओसंडून वाहू लागली आहेत. २०२० नंतर अशी स्थिती सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. सध्या भीमा पात्रात पंढरपूरजवळ एक लाख दहा हजारापर्यंत विसर्ग असल्याने चंद्रभागेचे पात्र ओव्हरफ्लो झाले आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

२०२० मध्ये सोडले होते १७५ टीएमसी पाणी

२०२० मध्ये पुणे जिल्ह्यात मोठा पाऊस झाला होता. त्यावर्षी उजनी धरणातून भीमा नदीत तब्बल १७५ टीएमसी पाणी सोडून देण्यात आले होते. त्यावेळी काहीवेळा एक लाखांहून अधिक क्युसेकचा विसर्ग सोडला गेला. २०२२ मध्ये देखील तेवढे टीएमसी पाणी सोडले गेले नाही, पण उजनीतून तीनवेळा ७० ते ८० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडला होता. पाच वर्षांनंतर यंदाच्या पावसाळ्यात उजनीवरील कालवे सलग १०० दिवस वाहिल्याचेही धरण व्यवस्थापनाचे अधिकारी सांगतात. तर १११ दिवसांत यंदा १५२ टीएमसी पाणी नदी, कालवा, उपसा सिंचन योजनांमधून सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

उजनीच्या पाण्यावर ९ कोटींची वीजनिर्मिती

मागील १११ दिवसांत उजनी धरणात यंदा तब्बल २७३ टीएमसी (दीड टीएमसीत सोलापूर शहराला वर्षभर पाणीपुरवठा होतो) पाणी आले आहे. उजनीत सध्या १२३ टीएमसी साठा आहे. उजनी धरण दुसऱ्यांदा भरले असते, यापेक्षा जास्त पाणी मागील साडेतीन महिन्यात सोडण्यात आले आहे. दुसरीकडे २० जूनपासून आतापर्यंत उजनीच्या पाण्यावर अंदाजे ८ ते ९ कोटींची वीज देखील तयार झाली आहे.