प्रकाश महाजनांची मनसेला सोडचिठ्ठी, यांना आव्हान दिल्याने राजसाहेब नाराज? कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा….

0

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या प्रकाश महाजनांना ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर मात्र बगल दिल्याने ते नाराज असल्याचं बोललं जातं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बडे नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नाराजीतून महाजनांनी पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा आहे, मात्र प्रकाश महाजनांनी राजीनाम्याचं नेमकं कारण स्पष्ट केलेलं नाही.  प्रकाश महाजन यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले असून ते अन्य पक्षात जाण्याची शक्यता दिसत नाही.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

माझं वय वाढलं आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, त्यामुळे मी थांबायचं ठरवलं आहे. कोणावर राग वगैरे नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली. मी अत्यंत लहान प्रवक्ता आहे. माझे कशावरही आक्षेप नाहीत, मी कुठल्याही मोठ्या पदावर नव्हतो, त्यामुळे माझ्यासारखा प्रवक्ता राहिला काय, गेला काय, पक्षाला विशेष फरक पडत नाही, असंही प्रकाश महाजन म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आपली मनस्थिती या वयात चांगली राहिली पाहिजे, त्यामुळे मी या सगळ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन राजीनाम्यानंतर म्हणाले. कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा आपण स्वतःच गेलेलं बरं, राग लोभ असण्याचं कारण नाही, असंही महाजन म्हणाल्याने भुवया उंचावल्या आहेत.

अमित ठाकरेंनी काढलेली समजूत

वाईट या गोष्टीचं वाटतं की अमित ठाकरेंना दिलेला शब्द पाळू शकलो नाही. मात्र बाकी कशाचंही ओझं माझ्या मनावर नाही, असंही ते म्हणाले. याआधी मनसेच्या मुंबईतील शिबिराला आमंत्रित न केल्यामुळे प्रकाश महाजन नाराज झाल्याची चर्चा होती. त्यानंतर खुद्द अमित ठाकरेंनी त्यांची भेट घेत समजूत काढली होती. त्यानंतर महाजनांची नाराजी दूर झाल्याचंही बोललं जात होतं.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

राणेंना आव्हान दिल्याने राज नाराज?

दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांना आव्हान देणं प्रकाश महाजनांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरेंची नाराजी त्यांनी ओढवून घेतल्याचंही बोललं जातं. राज आणि राणे यांच्यातील मैत्रीचं नातं सर्वश्रुत आहे. यातूनच राज ठाकरे महाजनांवर रागावल्याचंही बोललं जात असे.

ठाकरे बंधूंच्या एकीसाठी झटले

याआधी, उद्धव आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र आले नाहीत तर नियती माफ करणार नाही, असं प्रकाश महाजन म्हणत असत. परंतु हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकी दाखवल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. यात माझा कुठलाही राजकीय फायदा पाहत नाही, पण मराठी माणसाला हक्काची जागा मिळेल, अशी खात्री बाळगत ठाकरे बंधू भेट या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या होत्या.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दोन भाऊ आम्हालाच विसरले

दोन भाऊ एकत्र यावेत ही माझी मनापासून इच्छा होती, मात्र त्यावेळी कोणाला आठवण नाही झाली की या माणसाने अशी भूमिका घेतली होती. मी जोपर्यंत तिथे होतो, प्रामाणिकपणे काम करत होतो. बाळासाहेबांच्या समाधीजवळ मी ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशा सद्भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र आता दोन भाऊ आम्हालाच विसरले त्याला आम्ही काय करु शकतो, अशी खंतही त्यांनी राजीनाम्यानंतर बोलताना व्यक्त केली.