राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; हवामान खात्याचा अलर्ट काय?

0

महाराष्ट्रात गेल्या तीन चार दिवसांपासून तळपत्या उन्हाने आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. काही ठिकाणी स्थानिकांना काल परवा हलका ते मध्यम पावसाने दिलासा दिला. राज्यातील दमट हवामानामुळे नागरिकांची रात्रभर तारांबळ झाली. मान्सून काळ सुरू असताना सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यात तर पाऱ्याने पस्तिशी गाठली. पण आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. राज्यभर सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा वर्षाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात शेतकरी वर्गाच्या पेरण्या झाल्या पण दमदार पाऊस झाला नाही, त्या पट्यात पुन्हा पाऊस हाजिरी लावणार असल्याने शेतकरी सुखावणार आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

राज्यातील या जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्र राज्यात तळ कोकणासह पार विदर्भापर्यंत पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीडमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तर काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. या भागात नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काल सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मराठवाड्यात पावसाने त्याची चुणूक दाखवली. अनेक गावांसह शहरात दमदार बॅटिंग झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला. तर शहरातील सखल भागात पाण्याचे डबके साचले. धाराशिवमध्ये सर्वाधिक 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

विदर्भात पारा चढला

काल विदर्भात पारा वाढला. पारा 35 अंश सेल्सिअसच्या घरात पोहचला होता. नागपूरसह वर्ध्यात पारा उच्चांकी 35.5 अंश सेल्सिअसच्या घरात पोहचला. अकोला आणि अमरावती जिल्ह्यात पारा 35 अंशांच्या पुढे होता. उर्वरीत महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसाने दमटपणा वाढला. उकड्याने जनता हैराण झाली. काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते.

दरम्यान उत्तर भारतापासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. तर तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर चक्राकार वारे वाहत आहे. यामुळे कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याने महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता बळावली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार