राज्य परिवहन विभागाच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीएमएस) अंतर्गत मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलन जारी करण्यात आले. त्यापैकी सहा लाख २४ हजार चलान चुकीचे असल्याचे वाहतूकदार के. व्ही. शेट्टी यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशीलात उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘आयटीएमएस’च्या कार्यक्षमतेवर वाहनचालक आणि वाहतूकदार शंका उपस्थित करत आहेत.
मुंबई-पुणे महामार्गावर जुलै २०२४ पासून ‘आयटीएमएस’चा वापर सुरू झाला. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे आरटीओ आणि महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबविला जात आहे. १०० कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पासाठी परिवहन विभागाने ४५ कोटी दिले आहेत. ‘एमएसआरटीसी’ने ‘आयटीएमएस’चा भाग म्हणून ४० गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही या महामार्गावर कॅमेरे बसवले आहेत.
१७ प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास चलन
‘आयटीएमएस’मुळे महामार्गावरील अपघात रोखण्यास मदत झाली असली तरी, चुकीच्या ई-चलानची संख्या मोठी आहे. ओव्हर स्पीडिंग, सीटबेल्ट न लावणे, लेन कापणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि मोबाइलचा वापर यांसारख्या १७ प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी ई-चलान जारी होतात. मात्र, ओव्हर स्पीडिंगव्यतिरिक्त इतर नियमांच्या उल्लंघनाबाबत अनेकवेळा चुकीचे चलान झाल्याने काही चलान रद्द केले आहेत.
१२ टक्के दंड वसूल
‘आयटीएमएस’द्वारे वाहतूक उल्लंघनाचा अहवाल तयार केला जातो आणि ऑपरेटरचे कर्मचारी कमांड कंट्रोल सेंटर (सीसीसी) येथे त्याची पडताळणी करतात. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी चलान मंजूर करावे लागते. या महामार्गावर जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १८ लाख २५ हजार ई-चलान जारी केले. त्यापैकी सहा लाख २४ हजार चलान चुकीचे असल्याने रद्द झाले. उर्वरित १२४ कोटी २४ लाख रुपयांचे १२ लाख चलान होते. त्यापैकी जानेवारी २०२५ पर्यंत केवळ १२ टक्के चलानचा दंड वसूल करण्यात आला आहे.