जालिंदर सुपेकरांचा पर्दाफाश; मामांच्या सहीने सुशील शशांक दोन्ही भाच्यांना मिळाला शस्त्र परवाना, धक्कादायक माहिती समोर

0

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे बंधुंच्या अडचणीत आणखी वाढ होत असल्याचं चित्र आहे. वैष्णवीचा नवरा शशांक आणि दीर सुशील यांनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणे याच्याविरोधात वारजे तर सुशील हगवणे कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हगवणे कटुंबीय पुणे ग्रामीणमधील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात. त्यामुळे त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलीसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पुणे ग्रामीण पोलीसांनी दोघांचेही अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर दोघांनी ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते दिले. त्यासाठी ते भाड्याने राहत असल्याचे कागदपत्रे दाखवण्यासाठी भाडे करार तयार केला. शशांकने वारजेला तर सुशीलने कोथरुडला रहात असल्याचा पत्ता सादर केला. त्याआधारे पुणे पोलीसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी करण्यात आली. याप्रकरणी दोघां भावांवरती गुन्हा दाखल आहे, मात्र, आता या प्रकरणामध्ये हगवणेंचा पाहुणा आणि शशांक, सुशील यांचा मामा जालिंदर सुपेकर यांचं नाव देखील समोर आलं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

सुपेकर तेव्हा हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त

जेव्हा हगवणे बंधूंचे शस्त्र परवाने मंजूर झाले त्यावेळी त्यांचे मामा जालिंदर सुपेकर हे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. हगवणे बंधूंना पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना देण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी ठोस असं काही कारण नव्हतं. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस शहर दलामध्ये शस्त्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केला त्यावरती जालिंदर सुपेकर यांची सही देखील आहे या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली होती अशी माहिती समोर आली आहे.

हगवणे बंधुंना मिळालेल्या शस्त्र परवान्यांवर सही मामा सुपेकर यांचीच

हगवणे बंधुंनी शस्त्रपरवाना मिळवण्यासाठी 2022 मध्ये पुण्यातील बनावट पत्ते पोलीसांना सादर केले. त्या पत्त्यांची खातरजमा पोलीसांनी केली नाही. जालींदर सुपेकर हे त्यावेळी पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. त्यांनी स्वतःच्या सहीने शस्त्र परवान्याच्या अर्जावर मंजुरीची सही केली. शस्त्रपरवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी पाच जणांची समिती असते. ज्यात पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील एकचा समावेश असतो. सुपेकर यांनी त्यावेळचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडुन भाच्यांच्या शस्त्रपरवान्याची फाईल मंजुर करुन घेतली आणि नोव्हेंबर 2022 मध्ये परवान्यावर सही केली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप झाल्यानंतर गृह विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात आला आहे. जालिंदर सुपेकर यांनी यापूर्वीच आपली बाजू मांडली होती. वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही, असे सुपेकर यांनी सांगितले होते. मात्र आता सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांना शस्त्रपरवाना मिळवून देताना त्यांच्या मामांनी सुपेकरांनी मदत केल्याचं समोर आलं आहे.

जालिंदर सुपेकर काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना मदत केली, असा आरोप डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर झाला होता. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. गेल्या दोन वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे. त्यामुळे कार्यकारी पोलिस दलातील कोणताही घटक हा माझ्या आधिपत्याखाली नाही. त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे, असे कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी स्पष्ट केले होते. तसेच शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांना पिस्तूलचा परवाना दिल्याची बाब त्यांनी फेटाळून लावली होती.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता