मराठवाड्यात पाच दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस कमी- अधिक प्रमाणात सुरू आहे. रविवारी परभणी, हिंगोली जिल्ह्याचा अपवाद वगळता बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम आणि हलका पाऊस झाला. शेतशिवारांत पाणीच-पाणी झाले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शहरासह इतर तालुक्यांत दुपारी दीड तास मुसळधार पाऊस झाला. वीज पडून जालना जिल्ह्यात दोन जण तर लातूर जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. जोरदार वादळात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.






धाराशिव जिल्ह्यातील लोहारा परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. वाशी, भूम, तुळजापूर तालुक्यांत हलका पाऊस झाला. तसेच परांडा, कळंब, धाराशिव, उमरगा तालुक्यांत मात्र सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील इंदरठाना येथील गट नंबर १९ मध्ये वीज पडून सालगड्याचा मृत्यू झाला. गुणाजी किशन कदम (रा. चिखली, ता.कंधार, जि. नांदेड) असे मृताचे आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे वीज पडून राहुल विठ्ठल जाधव (वय १८) या तरुणाचा वीज पडल्याने मृत्यू झाला. भोकरदन तालुक्यात वीज कोसळून रामदास आनंदा कड (वय ३८) यांचा मृत्यू झाला.











