कोल्हापूरवाले निर्णय घेणार ‘भाजप पुणे’चा कारभारी कोण होणार! शहराध्यक्षपदी ब्राह्मण, मराठा की ओबीसी माळी चेहरा?

0

भारतीय जनता पक्षाकडून राज्यातील शहर आणि जिल्हाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून राज्यातील 24 जिल्ह्यांसाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या निरीक्षकांची शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. कोल्हापूरच्या खासदारांना पुणे शहर आणि जिल्हाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुण्यातील आमदाराला कोल्हापूरचा निरीक्षक करण्यात आले आहे.

सध्या भाजपमध्ये केंद्रापासून राज्यापर्यंत संघटनात्मक बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. भाजपकडून लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष देखील निवड होणार आहे. मात्र त्यापूर्वी मंडल अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पुणे शहर, मावळ, बारामती आणि पिंपरी-चिंचवडची जबाबदार भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे देण्यात आली आहे. तर पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्याकडे कोल्हापूर शहर, हातकणंगले आणि करवीरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजेश पांडे हे देखील सोलापूरची निरीक्षकपदाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

शहराध्यक्ष ब्राह्मण, मराठा की माळी

पुणे शहरातील विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही. तसेच या कार्यकाळामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आल्याने सध्याच्या कार्यकारणीला अधिकचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे मागील काळामध्ये ब्राह्मण आणि मराठा समाजातच प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा ओबीसी नेता शहराध्यक्ष व्हावा, अशी देखील मागणी करण्यात येत आहे. तसेच जवळपास ओबीसी नेताच शहराध्यक्ष होईल अशा चर्चा भाजपाच्या वर्तुळात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सध्या शहरातील आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर या ओबीसी नेत्यांची नावे शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

महाडिक बजावणार महत्त्वाची भूमिका

धीरज घाटेंना कार्यकाळ वाढून मिळणार की ओबीसी नेतृत्वाच्या हाती शहराची कमान सोपवण्यात येणार की मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्याला भाजप शहराध्यक्ष होण्याचा मान मिळणार हे निश्चित करण्यात निरीक्षक म्हणून धनंजय महाडिक यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे पुणे शहराच्या शहराध्यक्ष पदाच्या चाव्या कोल्हापूरकराच्या हातात आहेत, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.