हा नेता दुसऱ्यांदा NCP सोडणार? पालकमंत्रीही सक्रिय; आधी खासदारकी गेली, दादांकडे जाऊनही आमदारकीचं स्वप्न भंगल

0

सांगली: दोन टर्म खासदार राहिलेले संजय काका पाटील घरवापसी करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी दोन पराभव पाहिले. आधी लोकसभेला आणि मग विधानसभेला त्यांचा पराभव झाला. लोकसभेची निवडणूक त्यांनी भाजपकडून लढवली. त्यांनी हॅट्ट्रिकची संधी होती. पण त्यांचा पराजय झाला. यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढले. त्यातही त्यांना पराभव पाहावा लागला. त्यानंतर आता ते पुन्हा एकदा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासूनच संजय काका पाटील राष्ट्रवादीतच राहणार की पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा सुरु झाली होती. आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय काकांची त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतल्यानं त्यांच्या घरवापसीच्या चर्चेनं जोर धरला आहे.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास संजय पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना २००८ ते २०१४ या कालावधीत ते विधान परिषदेचे आमदार होते. फेब्रुवारी २०१४ मध्ये त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यावेळी देशात मोदी लाट होती. त्याचा फायदा पाटील यांना झाला. लोकसभा निवडणुकीत ते २ लाख २८ हजार मतांनी विजयी झाले. त्यांच्यामुळे भाजपचं कमळ सांगली लोकसभेत पहिल्यांदा फुललं. तब्बल ५२ वर्षे काँग्रेसचा गड राहिलेली सांगलीची जागा पाटील यांच्यामुळे भाजपकडे गेली.

२०१९ मध्येही संजय काका पाटील लोकसभेवर निवडून गेले. त्यावेळी त्यांनी १ लाख ६४ हजार ३५२ मतांनी विजय मिळवला. स्वाभिमानीच्या तिकिटावर लढलेल्या विशाल पाटलांचा पराभव करत पाटील दुसऱ्यांदा खासदार झाले. २०२४ मध्ये विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. ते अपक्ष लढले आणि त्यांनी संजय पाटलांचा १ लाख मतांनी धुव्वा उडवला. विजयी झाल्यानंतर पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.

अधिक वाचा  पुणे महापालिका आरक्षण सोडत तयारीत असतानाच शासनाचे परिपत्रक जारी; 10 नोव्हेंबरचा मुहूर्त प्रशासन साधणार का?

लोकसभेला पराभूत झालेल्या संजय काका पाटलांनी तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून विधानसभा लढण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. ही जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यानं संजय काका पाटलांनी घड्याळ हाती घेतलं. पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी त्यांना पराभवाचा धक्का दिला. रोहित पाटलांनी २७ हजार ६४४ मतांनी बाजी मारत संजय काकांचा पराभव केला. ६ महिन्यात दुसरा पराभव संजय काकांच्या वाट्याला आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. संजय काका पाटील दुसऱ्यांदा राष्ट्रवादी सोडतील आणि दुसऱ्यांदा भाजपमध्येच जातील, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

अधिक वाचा  महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण दुर्देवी न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार