“नागपुरातील दंगलखोरांना सोडणार नाही व त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र दंगलखोरांवर कारवाई करणार म्हणजे ते नक्की काय करणार? खरे दंगलखोर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व कारवाईचा बडगा सगळ्यात आधी त्यांच्यावरच उगारला जायला हवा. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी चिथावणी देणारे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. हे मंत्री, भाजपचे आमदार, मिंधे गटातील बाटगे हिंदुत्ववादी यांनी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवले व त्यातून नागपुरात दंगलीची ठिणगी पडली,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.






भाजपवाल्यांचा मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा ठरवून प्रयत्न
“खोटे नरेटिव्ह निर्माण करायचे व लोकांत गोंधळ उडवायचा हे भाजप आणि त्यांच्या लोकांचे धोरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस ‘हत्या’, ‘खून’ वगैरे ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात रिया चक्रवर्ती भरडली गेली. तिच्यावर ठपका ठेवून तुरुंगात ढकलले. आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. या प्रकरणात संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले व रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली, पण मग रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलून जी बदनामी केली गेली, तुरुंगवास भोगायला लावला त्याची भरपाई कोणी करायची? येथेही सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हे दाखल करणे, याचिका दाखल करणे वगैरे प्रकार केले, पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार भाजप व त्याच्या भाडोत्र्यांनी केले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका
“कंगना राणावतसारख्यांना तर मुंबईत राहणे म्हणजे पाकिस्तानात राहण्यासारखे भासत होते. मग आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवर त्यांना काय वाटते? दंगलखोरांना सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. तसे या ‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका. महाराष्ट्राचे समाजजीवन खतम करण्याचे काम या लोकांनी चालवले आहे. औरंगजेब, सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन या मृतांचा बाजार भरवून राजकारण करण्याचा षंढपणा वाढला आहे. मुख्यमंत्री चिंता व्यक्त करतात की, नागपूरच्या दंगलीवरून राजकारण होत आहे? मुख्यमंत्री महोदय, राजकारण नक्की कोण करत आहे आणि दंगलीच्या आगीत तेल कोण टाकत आहे? याचा शोध खरेच घेतला तर सत्य समोर येईल,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
हे कसे चालेल?
“मुख्यमंत्र्यांनी पुढे जाहीर केले की, जे कोणी देशभक्त आहेत त्यांना हात लावला जात असेल तर सहन केले जाणार नाही. जे कोणी कायदा हातात घेतील, पोलिसांवर हात टाकतील त्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका कठोर आहे, पण देशभक्त कोण व देशद्रोही कोण हे ठरवायचे कोणी? औरंग्याची कबर तोडा असे सांगणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. देशभक्तीचे प्रमाणपत्र हेच लोक देणार व दंगलींना प्रोत्साहनही तेच देणार हे कसे चालेल?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
स्वतःच्या कॅबिनेटपासून कारवाई सुरू करा
“नागपूरचा हिंसाचार ही महाराष्ट्रात मोठ्या दंगली घडवण्याची पूर्वतयारी आहे. लोकांची माथी भडकवणे व हिंसाचार करणे शक्य आहे याची राजकीय चाचपणी नागपुरात झाली. दंगलीचे रॉकेट यशस्वीपणे उडाल्यावर मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘दंगलखोरांना सोडणार नाही,’’ मात्र जे दंगलखोर मंत्रिमंडळात बसून मुख्यमंत्र्यांना, कायद्याला आव्हान देतात, ‘‘मुख्यमंत्र्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही हवा तसा धुडगूस घालू, आगी लावू, आमचे कोण काय वाकडे करणार?’’ असे उघडपणे बोलतात त्यांचे काय? त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वर मुख्यमंत्री शहाजोगपणे सांगतात की, दंगलखोरांना सोडणार नाही. खरे तर दंगलखोरांना न सोडण्याची कारवाई मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेटपासून सुरू करायला हवी,” असा खोचक सल्ला ठाकरेंच्या सेनेनं दिला आहे.
...मग खुर्च्या उबवताय कशाला?
“धनंजय मुंडे यांच्या लोकांनी बीड जिल्ह्यात गुंडगिरी आणि दडपशाहीचा उत्पात माजवला व त्यातून खून, खंडण्यांचे गुन्हे वाढले. मुख्यमंत्र्यांना मुंडेंवरील कारवाईबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर काय दिले? “उगाच हवेत तीर मारू नका. धनंजय मुंडेंविरोधात काही पुरावे असतील तर घेऊन या. कारवाई करतो,’’ असे ते म्हणाले. म्हणजे पोलीस काहीच करणार नाहीत. खून पडल्यावर आवाज जनतेने उठवायचा आणि पुरावेही जनतेनेच गोळा करून द्यायचे. मग तुम्ही खुर्च्या उबवताय कशाला? अदानीसारख्यांची संपत्ती वाढवायला?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
...तर तुमची ही ‘सोडणार नाही’ची भाषा निरर्थक
“राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे. भ्रष्टाचारावर कारवाई नाही आणि दंगलखोरांवरही कारवाई नाही. सगळाच वरवरचा मामला. राज्याचे मुख्यमंत्री दंगलीचे गुन्हेगार काखेत घेऊन फिरत आहेत आणि पुन्हा सांगत आहेत की, दंगलखोरांवर कारवाई करू. चोर घरातच आहे आणि मालक बाहेर उगाच बोभाटा करीत आहे. दंगली भडकवणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार नसाल तर तुमची ही ‘सोडणार नाही’ची भाषा निरर्थक आहे,” असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं फडणवीसांना सुनावलं आहे.











