नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने जोरदार मुसंडी मारत 41 जागा जिंकल्या आहे. तर शरद पवार गटाला पराभवाचा धक्का पचवावा लागला. पण अजूनही राष्ट्रवादी कुणाचीही हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. अशातच आता 25 मार्च रोजी सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या पक्षासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. पक्ष नाव आणि चिन्ह या संदर्भात जयंत पाटील यांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर 25 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या द्विसदस्य खंडपीठामुळे ही सुनावणी होणार आहे दुपारी बारानंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांनी काका शरद पवारांची साथ सोडून महायुतीत सामील झाले होते. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांसह प्रमुख नेत्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. पण या गटानेही राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा केला. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. कोर्टाने घड्याळ चिन्ह वापरण्यास अजित पवार गटाला अटी आणि शर्थी घालून दिल्या होत्या. तर शरद पवार गटाला स्वतंत्र्यपणे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं होतं.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. तर शरद पवार गटाने तुतारी वाजवणाऱ्या माणूस चिन्हावर निवडणूक लढवली. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर विधानसभा निवडणुकीत वारं बदललं. अजित पवार गटाने सर्वाधिक ४१ जागा जिंकल्या होत्या. तर शरद पवार गटाला फक्त ७ जागांवर समाधान मानावं लागलं. अजित पवार गटाने महायुतीत राहुन दमदार कामगिरी केली. तर महाविकास आघाडीसोबत लढून शरद पवार गटाने सर्वात कमी जागा जिंकल्या. आता स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, त्याआधी राष्ट्रवादी कुणाची? याचा निर्णय सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे.