शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं वर्णन कसं कराल? जयंत पाटलांच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर; म्हणाले, “काही भरवसा…”

0

गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच ढवळून निघालं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. यावरून उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत दिली. यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका वाक्यात उत्तर दिलं.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

जयंत पाटलांनी काय प्रश्न विचारला?

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं दोन-दोन वाक्यात तुम्ही कसं वर्णन कराल? असा प्रश्न जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी दोन वाक्याऐवजी एका वाक्यात उत्तर दिलं. फडणवीसांनी म्हटलं की, “एका वाक्यात उत्तर देतो. वाईट वाटून घेऊ नका. काही भरवसा नाही. या वाक्यात दोघांची देखील वागण्याची पद्धत आली. काही भरवसा नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांबाबत फडणवीस काय म्हणाले?

नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे”,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा