नागपूर भालदारपुरा परिसर हिंसाचारात जमावाची महिला पोलिसशी अश्लील चाळे विवस्त्रचा प्रयत्न मोठा अनर्थ टळला

0

नागपूर : भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून, तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

काय घडलं नेमकं?

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री हिंसाचार उसळल्यानंतर सुमारे पाचशे जणांचा जमाव घोषणा देत दगडफेक करीत होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस उपायुक्त निकेतन कदम, पोलिस उपायुक्त शशिकांत सातव आणि पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्यासह पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, नितीन राजकुमार, पोलिस उपनिरीक्षक, पाच कर्मचारी व दंगल नियंत्रण पथकातील महिला पोलिस तिथे गेले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

जमावाने पोलिसांवर दगडफेक करायला सुरुवात केली. त्यांना शिवीगाळ केली. पोलिसांवर हल्ला चढविला. त्यांना मारहाणही केली. एका जमावाने महिला पोलिसाला पकडले. तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत अश्लील चाळे केले. वेळीच महिला पोलिसाने स्वत:ची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली.

सशस्त्र पोलिस २४ तास गस्तीवर

दरम्यान, नागपूरमध्ये महाल परिसरात सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर महाल, मोमीनपुऱ्याशिवाय शहरातील अतिसंवेदनशील अकरा व संवेदनशील एकोणीस ठिकाणी पोलिसांचे ‘फिक्स पॉइंट’ लावण्यात आले आहेत. या परिसरात सशस्त्र पोलिस २४ तास गस्त घालत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने गांधीगेट परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिमांच्या प्रतीकांचा अवमान झाल्याचा आरोप करत मुस्लिम समाजातील व्यक्तींनी पोलिसांत तक्रार केली.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

हा कथित प्रकार वाऱ्यासारखा पसरल्यानंतर काही समाजकंटकांनी महालात दगडफेक आणि जाळपोळ केली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसावर हल्ला केल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. सर्व नेत्यांनी शांततेचे आवाहन केले. रात्री उशिरा तणाव निवळू लागला.

कारवाई करा : विहिंप

आम्ही कुठलेही धार्मिक साहित्य जाळले नाही. तशी अफवा पसरविणाऱ्यांवर आणि दंगल घडवून धार्मिक स्थळावर हल्ला करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी पत्रकार परिषदेत घेत केली.