महायुती 2.0 अर्थसंकल्पात पुणे झाले उणे? 3 कॅबिनेट मंत्री 1 राज्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात पुरेसे प्रतिबिंब नाहीच

0
4

राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबई महानगर प्रदेशाच्या हद्दीत ६४ हजार कोटी रुपयांची तरतूद विविध प्रकल्पांसाठी करण्यात आली असताना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना पुण्याचाच विसर पडला आहे. पुण्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची तरतूद केली जाईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. राज्यभरातील लहानमोठ्या शहरातील विमानतळांची जंत्री वाचताना पुण्यासाठी पुरंदर येथील बहुप्रतीक्षित नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उल्लेखही पवार यांनी संपूर्ण भाषणादरम्यान केला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पातून पुण्याची पाटी कोरीच राहिली आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये सात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र विकसित करताना पुण्याच्या ग्रोथ सेंटरकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटले आहे. राज्यातील विविध विमानतळांना भरघोस निधी देताना पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनावर साधे भाष्यही केले नाही.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

पुण्याने २०१४पासून महायुती सरकारला भरघोस पाठिंबा दिला. पुण्यात राज्य आणि केंद्र सरकारमधील अनुक्रमे चार आणि एक असे पाच मंत्री आहेत. त्यामुळे पुण्यातील विकासाचा वेग हा इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा अधिक असेल, अशी अपेक्षा असताना अर्थसंकल्पात पुण्यासाठी कुठलीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही.

पुरंदर विमानतळाचा नामोल्लेखही टाळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय, पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसाठी राज्य सरकारकडून निधीची तरतूद होईल, ही अपेक्षा पूर्ण झालेली नाही.

पुण्याला पुरेसा निधी नाहीच

पुण्यासाठी यापूर्वी सुरू झालेल्या अथवा प्रगतिपथावर असलेल्या मेट्रो प्रकल्प, पुणे-मुंबई दरम्यानची ‘मिसिंग लिंक’ व म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीतील सुविधांचे नूतनीकरणाचा केवळ पुनरुच्चार अर्थमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान केला.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

तुळापूर-वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा केवळ नामोल्लेख झाला.

पुणे ते शिरूरदरम्यानच्या उन्नत महामार्ग आणि तळेगाव-चाकण दरम्यानच्या उन्नत मार्गासाठी खर्च करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

या कामांच्या निविदा काढण्यात आल्या असून, पुढील काही महिन्यांत त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

मात्र, तीन कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री असे मोठे मंत्री असतानाही पुण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पात पुरेसे निधीचे प्रतिबिंब उमटलेले नाही, अशीच भावना आहे.