राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा नेहमीच होत असतात. आतापर्यंत तरी या अफवाच ठरल्या आहेत. स्वतः पाटील यांनीही या चर्चांवर उत्तर देत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जयंत पाटील यांचे झालेले गुफ्तगू या चर्चांना पुन्हा कारणीभूत ठरले आहे.






जयंत पाटील भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील तीन वर्षांपासून सुरू आहेत. ते भाजप प्रवेश का करणार याची 10 कारणे सांगणारा व्हिडीओ भाजपच्याच अधिकृत ट्विटर हँन्डेलवरून प्रसिद्ध करण्यात आला होता. वादानंतर तो डिलीटही झाला. त्यानंतरही पाटील यांच्याविषयीच्या चर्चा थांबल्या नाहीत. मुलाच्या लोकसभा तिकीटासाठी ते भाजपमध्ये जाऊ शकतात अशी चर्चा होत राहिली. जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्यासोबत कायम राहिले.
आता विधानसभा निवडणुकीनंतर पाटील महाविकास आघाडीपासून अलिप्त राहिल्याचे दिसून आले. तर पुन्हा एकदा भाजपशी जवळीक वाढली. इतकी की रिकामे ठेवण्यात आलेले मंत्रिपद त्यांचेच असल्याच्या चर्चा झाल्या. गेल्याच महिन्यात नितीन गडकरी सांगली दौऱ्यावर आले होते. ते पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते. त्यानंतर जिल्ह्यात जयंत पाटील यांच्याविषयी पुन्हा सर्वांच्याच मनात शंकेची पाल चुकचुकली.
मात्र त्या सर्व चर्चांना गडकरींसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम दिला होता. तर जयंत पाटील देखील अशी बातम्यांमुळे पूर्ण वैतागले होते. त्यांनी थेट पत्रकारांचीच शाळा घेत आता गडकरी साहेब राष्ट्रवादीत अशा बातम्या देणार का असा सवाल केला होता. या चर्चा शांत होतात की नाही तेच जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी गुप्त भेट झाल्याची बातमी आली.
पण या भेटीवर दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी ही भेट आपण मतदारसंघातल्या विकासकामांसाठी घेतली असल्याचं सांगितलं आहे. तसेच या भेटीवेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित असल्याचे सांगितले आहे. याला बावनकुळे यांनीही दुजोरा दिला होता.
आता भाजपचे वरिष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यांशी भेट झाल्याने नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ब्राह्मण समाजाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात जयंत पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यासपीठावरच एकमेकांच्या कानात चर्चा केली. यानंतर दोघांनी निरोप घेतला. या गुफ्तगुमुळे आता उपस्थितांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मनोगतातही जयंत पाटील यांचे विशेष कौतुक केले. शिवाय एकाचवेळी बाहेर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावरील चर्चेनंतर जाताना पुन्हा एकदा त्यांनी तिथेच कानात चर्चा केली. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचेही याकडेच लक्ष गेले. पण दोघांतील चर्चा गुलदस्त्यात राहिल्यानेच आता असून पुन्हा एकदा चर्चेला सुरूवात झाली आहे.












