सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीला कनिष्ठ लिपीकची नोकरी; धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया, नोकरी आधी… 

0
6

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना केजमधील शिक्षण संस्थेत नोकरी देण्यात आली आहे. केज तालुक्यातील आडस गावातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक पदाची नोकरी त्यांना देण्यात आली आहे. ही शिक्षण संस्था रमेश आडसकर यांची असून स्वत: रमेश आडसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना नियुक्ती पत्र दिलं आहे.

अशातच, सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुखांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावर मी कुटुंबात आधी चर्चा करणार आणि त्यानंतर त्या बाबत कळवू, असे धनंजय देशमुख म्हणालेत. शिवाय  नोकरी आधी कुटुंबियांना संरक्षण द्या, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

नोकरी आधी कुटुंबियांना संरक्षण द्या- धनंजय देशमुख

माझ्या भावाच्या हत्या करणाऱ्याला फाशाची शिक्षा झाली पाहिजे. आज राष्ट्रवादीचे जिल्हा आध्यक्ष राजेश्वर चव्हाण भेटायला आले होते.  त्यांना आम्ही सांगितले की मला सध्या संरक्षणाची गरज आहे. काल (13 फेब्रुवारी) सुदर्शन घुले हा केजचा कोर्टात आला होता. त्यावेळी त्याला समर्थन देण्यासाठी त्याचे समर्थक कोर्टाच्या बाहेर आले होते. जे आम्हाला भीती दाखवतात त्यांचा आधी बंदोबस्त करा, अशी मागणी मी राजेश्वर चव्हाण यांच्याकडे केली आहे. नोकरीच्या आधी माझ्या कुटुंबाला संरक्षण देणे महत्वाचे आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना नोकरी दिल्याच्या विषयावर मी कुटुंबात आधी चर्चा करू त्यानंतर कळवू, अशी भूमिका सध्या धनंजय देशमुख यांनी घेतली आहे. या आरोपीची बी टीम आहे.  ते कायम आमच्या गावाला धमकवतात. गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात.  त्यांचा आधी बंदोबस्त करा अशी मागणी ही धनंजय देशमुख यांनी केली आहे.

अधिक वाचा  मॉडर्न विकास मंडळाचे द्विदशकी “मोफत तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र” नामदार चंद्रकांत दादांच्या हस्ते उद्घाटन ५७ रुग्णांसाठी ठरलं जीवनदायी

सामाजिक बांधिलकी म्हणून नोकरी दिली- रमेश आडसकर

स्वर्गीय संतोष देशमुख आणि आडसकर कुटुंब हे एकच होते. राजकीय क्षेत्रात काम करत असताना वेगळं पण आदर करून त्या कुटुंबाचे नाते निर्माण झाले होते. देशमुख यांची हत्या चुकीच्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून त्याला कुठलाही राजकीय रंग न देता त्यांना नोकरी दिली असल्याचं मत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी व्यक्त केले आहे.