दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपकडून फोन आल्याबद्दल आणि १५ कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याबद्दल आप नेत्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानंतर, एसीबीची पथके आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीचे पथक आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे.






केजरीवाल यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता, भ्रष्टाचार विरोधी शाखेचे पथक केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे आणि केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकासोबत बसले आहे. दरम्यान, एसीबी कार्यालयात संजय सिंह यांचे जबाब नोंदवले जात आहेत. एसीबीने एकूण ३ टीम तयार केल्या आहेत. या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मार्फत सखोल चौकशी करावी, असे एलजीने म्हटले आहे.
भाजप नेत्याने केली होती चौकशीची मागणी
दिल्ली भाजपचे सरचिटणीस विष्णू मित्तल यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांना पत्र लिहून अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी आपच्या ७ विद्यमान आमदारांना १५ कोटी रुपयांची लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आणि एफआयआर नोंदवण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग आणि इतर कोणत्याही तपास संस्थेला निर्देश देण्याची विनंती केली आहे.
आप नेते संजय सिंह म्हणाले, “मी माझ्या वकिलाकडे तक्रार करण्यासाठी आलो आहे. भाजप आमदारांच्या घोडेबाजारात सहभागी आहे आणि त्यांनी आमच्या आमदारांना आणि मंत्र्यांना प्रत्येकी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. मी भाजपविरुद्ध तक्रार करण्यासाठी एसीबी कार्यालयात आलो आहे.”
संजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, एसीबी भाजपच्या तक्रारीची वाट पाहत होती का? जेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर कोणतीही कारवाई का केली गेली नाही? आतापर्यंत १६ हून अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला आहे, आम्ही एकाचा नंबर जाहीर केला आहे. जर एसीबीने यावर कारवाई केली तर आम्ही अधिक माहिती देऊ. आपच्या कायदेशीर कक्षाचे प्रमुख संजीव नसियार म्हणाले, “एसीबी टीमकडे कोणत्याही प्रकारची कोणतीही सूचना नाही. ते आल्यापासून ते सतत फोनवर कोणाशी तरी बोलत आहेत.” असे नासियार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.











