राज्यभरात चक्काजाम आंदोलन; एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

0

एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकीटात दरवाढीची घोषणा केली. त्यामुळे राज्यभरात वादाचा बिगुल वाजला. एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे. आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात उद्धव सेनेने चक्काजमा आंदोलनाचा पुकारा केला आहे. राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक दिसले. त्यांनी ही भाडेवाढ त्वरीत मागे घेण्याची मागणी केली आहे. भाडेवाढ मागे घेतल्या जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

एसटीची १५ टक्के भाडेवाढ

ग्रामीण भागातील जीवनवाहिणी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ झाली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. पण या भाडेवाढीमुळे कोकणातून पुणे आणि बोरिवली प्रवासाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पुण्याचे प्रवासी तिकिटासाठी आधी ५४० रुपयांवरून ६२४ रुपये झालं आहे. तर रत्नागिरी बोरिवलीच्या तिकिटासाठी ५५० रुपये मोजावे लागत होते. ते आता ६३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

राज्यातील विविध भागात चक्काजाम

बीड- एसटी दर वाढ विरोधात बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून बीड बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरवाढ कमी करण्यात आली नाही तर राज्यभर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

अमरावती – एसटी महामंडळाने तिकीट दरात 15% केलेल्या वाढीचे निषेधार्थ आज अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे. बस स्थानक बाहेर एकही बस जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाने घेतला आहे.

सोलापूर – शिवसेना ठाकरे गटाकडून एसटी तिकीट दरवाढी विरोधात निदर्शने सुरु आहेत. सोलापूर एसटी बस स्टँडच्या गेटवर ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. एसटीचे तिकीट दर वाढवल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक दिसला. एसटीचे वाढवलेले तिकीट दर कमी करावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात येत आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

ठाणे – एसटी भाडे दरवाढ त्याचप्रमाणे टॅक्सी आणि रिक्षा भाडे दरवाढी विरोधात ठाण्यात ठाकरे गट आक्रमक झाला. खोपट बस आगारात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सरकारच्या विरोधात घोषणबाजी करण्यात आली.

कल्याण – एसटी भाडेवावाढीच्या विरोधात कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. कल्याण विठ्ठलवाडी बसडेपोच्या गेटवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन करत चक्काजाम केला. बस डेपो मधून बाहेर पडणारी बस रोखून धरली.

कोल्हापूर – ST तिकीट दरवाढी विरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाचा चक्काजाम आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक बाहेर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

बुलडाणा – अनेक मोठे मोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांची काम करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे. एकीकडे लाडक्या बहिणींचे लाड करायचे तर दुसरीकडे एसटीची भाडे वाढ करायची. एसटीचे भाडे वाढ ही सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणारे असल्याच म्हणत या भाडेवाडीला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून बुलढाणा मध्यवर्ती बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले.

धुळे – एस टी महामंडळाने भाडेवाढ केल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. एसटी बसेस अडवल्याने काही वेळ वाहतूक खोळंबा झाला होता. प्रशासनाने एसटीच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. एसटी भाडेवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.