वाल्मिक कराडची तब्येत बिघडली; मध्यरात्री तुरूंगातून थेट आयसीयूत दाखल केलं, नेमकं काय घडलं?

0
4

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्याच दिवशी रात्री बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडच्या पोटात अचानक दुखू लागल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वाल्मिक कराडवर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. तसंच रुग्णालयात त्याची सोनोग्राफी करण्यात आली आहे. तसंच मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी देखील करण्यात आली. बुधवारी रात्री (ता.22) पावणे बाराच्या दरम्यान कारागृहातून त्याला रुग्णालयात दाखल केलं.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आत्तापर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह एकूण 9 आरोपींविरोधात मकोका कायद्यांतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. याआधी न्यायालयानं वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात कोठडी सुनावली होती.

त्यानंतर सरपंच देशमुख हत्याप्रकरणातही त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत सुनावली. तर बुधवारी वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याला स्लीप एपनिया आजार असून CPAP मशीनची गरज असल्याचं न्यायालयात सांगितलं. त्याप्रमाणे न्यायालयाने वाल्मिक कराडला CPAP मशीन देण्याची मागणीला मान्यता दिली.

मात्र, बीड येथील कारागृहात असलेल्या कराडची तब्येत बुधवारी रात्री अचानक बिघडल्याने आता त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आता इथून पुढे वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील जामिनासाठी कोर्टात गेले तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपीला जामीन मिळू शकत नाही.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

त्यामुळे पुढचे सहा महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागू शकतं. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीला ज्या ज्या वेळी वाल्मिक कराडची चौकशी करायची असेल त्यावेळी कोर्टाच्या परवानगीने ते चौकशी करु शकतात.