पुणे शिवसेनेला स्वबळावर 2017 मध्ये 14 % मते पालिका निवडणुकीपूर्वी जुळवा-जुळव ‘साहेब किती गळाले….

0
1

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर रणनीती आखण्यात येत आहे.याबाबतचा एक प्रस्ताव पुणे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना दिला आहे. या प्रस्तावात गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेल्या पैकी किती नेते अद्याप आपल्याकडे आहेत याचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडणारी संख्या मोठी आहे. पुण्यात देखील ठाकरेंच्या सेनेला गळती लागली असून पाच माजी नगरसेवकांनी सेनेला जय महाराष्ट्र करत भाजपची वाट धरली आहे. तसेच अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

या पार्श्वभूमी वर 2017 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढलेले आणि सात ते दहा हजार मतदान घेतलेले नेते सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेत आहेत की त्यांनी देखील वेगळी वाट निवडली आहे. याबाबतची चाचपणी ठाकरेंच्या शिवसेनेतून करण्यात येणार आहे. नुकतेच पुण्यातील ठाकरे सेनेच्या नेत्यांनी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आणि विधानपरिषद आमदार सचिन आहिर यांची भेट घेऊन पुणे महापालिकेच्या संदर्भात संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे.

यावेळी पुणे संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर शहराध्यक्ष संजय मोरे आणि शहराध्यक्ष गजानन थरकुडे , माजी नगरसेवक वसंत मोरे ,संजय भोसले, पृथ्वीराज सुतार तसेच कामगार नेते रघुनाथ कुचिक उपस्थित होते. या भेटी दरम्यान मागील निवडणुकीत 2017 मध्ये शिवसेनेने स्वबळावर पुण्यामध्ये निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आठ लाख 23 हजार इतकी मतं मिळाली होती. जवळपास 14 टक्के मतदान हे शिवसेनेला झालं होतं.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

त्यामुळे त्या वेळेचा विचार केल्यास शिवसेना 138 जागांवरती स्वबळावरती निवडणूक लढण्यास सक्षम असल्याचं स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांना सांगितलं आहे. तसेच महाविकास आघाडी म्हणून लढायचं झाल्यास 60 ते 65 जागा आपल्याला घ्याव्यात अशी देखील मागणी या नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे. पुढील आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे पुण्यात येणार असून या सर्व बाबींवरती सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.