आरोग्य सुविधेसाठीचा साडेसात कोटीचा देणगी निधी महापालिकेकडे पडून: सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर

0

कोरोनाच्या काळात पुणे महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा व उपचार मिळावेत यासाठी विविध कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) दिला होता. त्यापैकी साडेसात कोटी रुपयांचा निधी अजूनही न वापरता हा बँक खात्यात पडून आहे. हा निधी पुणेकरांना आरोग्य सुविधा यंत्रसामग्री पुरवण्यासाठी वापरणे अपेक्षित होते. पण महापालिकेने त्याचा वापर केलेला नाही, अशी माहिती सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी दिली.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२० मध्ये नागरिकांना व कंपन्यांना महापालिकेला देणगी देण्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत २०२०-२१ मध्ये ४.८९ कोटी, २०२१-२२ मध्ये ३.१० कोटीची देणगी मिळाली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

२०२०-२१ मध्ये यातील एक पैसाही महापालिकेने खर्च केला नाही, तर २०२१-२२ मध्ये १.३० कोटी रुपये खाट आणि ऑक्सिजसाठी खर्च केले. शिल्लक रकमेवर महापालिकेला आत्तापर्यंत ७० लाख रुपये व्याज मिळाले असून, कोरोना सीएसआर खात्यात ७.४३ कोटी रुपये पडून आहेत.

कोरोना काळातील नागरिकांचे हाल बघून महापालिकेला निधी दिला, पण त्याचा वापर प्रशासनाला करता आला नाही. यापुढे एखादी आपत्ती आली तर नागरिक महापालिकेला मदत करण्यासाठी पुढे येतील का? याचा विचार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला नाही.

जुलै २०२३ मध्येही या रकमेचा वापर करावा हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. पण दीड वर्षानंतरही या निधीचा योग्य वापर केला नाही. आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांना यासंदर्भात विचारले असता याची माहिती घेतली जाईल असे सांगितले.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार