धनंजय मुंडे आज राज्यातले एक मोठे नेते आहेत. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेटमंत्री, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे, कॅबिनेटमंत्री पंकजा मुंडेंचे चुलत बंधू, अजित पवारांचे विश्वासू, बीड जिल्ह्यातलं कणखर नेतृत्व, वंजारी समाजाचा चेहरा…अशा वेगवेगळ्या ओळखी त्यांच्या आहेत. यात आणखी एक भर पडली ती म्हणजे वाल्मिक कराड हा धनुभाऊंचे निकटवर्तीय.. पण हीच नवी ओळख कुठेतरी त्यांना अडचणीत आणणारी ठरतेय. त्यामुळेच धनुभाऊंना राजकारणात एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय, असंही बोललं जातंय. तरी, आता अचानक धनंजय मुंडेंना का टार्गेट केलं जातं? हे जाणून घेऊया…






वाल्मिक अण्णा तो झाँकी है, धनंजय मुंडे अभी बाकी है… अगदी अशीच राजकीय परिस्थिती मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात झाली आहे. झालं असं की, बीडमधील सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. आणि त्यातच कॅबिनेटमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडेंच्या अडचणीतही भर पडली. यातच धनुभाऊ कुठेतरी एकाकी पडलेले दिसताहेत. तरी त्यामागे नेमकी काय कारणं आहेत समजून घेऊयात-
धनंजय मुंडेंना आताच का टार्गेट केलं जातंय?
• एकतर ते राज्याचे कॅबिनेटमंत्री आहेत. दुसरं म्हणजे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे. पालकमंत्रिपदासाठी खरंतर त्यांची स्पर्धा त्यांच्या चुलत बहीण अन् राज्याच्या कॅबिनेटमंत्री पंकजा मुंडेंशीच आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद मिळू नये यासाठी बीड जिल्ह्यातील बहुतांश आमदार आणि खासदार प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय.
• मराठवाड्याबाबत सांगायचं तर लातूर जिल्हा विलासराव देशमुख आणि नंतर त्यांच्या मुलांचा, नांदेड जिल्हा अशोक चव्हाणांचा तसा बीड जिल्हा हा आधी गोपीनाथ मुंडेंचा होता तर आता तो धनंजय मुंडेंचा झालाय. त्यामुळे असं म्हटलं जातं की, बीडमध्ये असं एकही काम नाही जे धनंजय मुंडेंना डावलून करता येऊ शकतं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा बीड जिल्हा अशी ओळख ही आता काहींना नकोशी वाटतेय. त्यामुळे धनंजय मुंडेंना घेरलं जातंय.
• करुणा मुंडेंच्या वादानंतर धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित केले जातात. त्यांच्याकडे कायम संशयास्पद नजरेनं पाहिलं जातं. अन् आताही अनेक अभिनेत्री आणि इतर महिलांची नावं घेऊन विरोधक हे पुन्हा कॅबिनेटमंत्री असलेल्या धनंजय मुंडेंच्या चारित्र्यावर टीका करताहेत.
• पंकजाताई मुंडेंची ती व्हिडिओ क्लिप… खरंतर वाल्मिकअण्णा कराड हे बीडचे आका आहेत असं उत्तमराव जानकरांपासून सुरेश धसांपर्यंत सगळ्यांनी म्हटलंय. पण, यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल झाली ती क्लिप होती पंकजाताईंच्या दसरा मेळाव्यातल्या एका भाषणातली. त्या क्लिपमध्ये पंकजाताई मुंडे या वाल्मिकअण्णा कराड यांची ओळख करून देताना म्हणतात- ज्यांच्याशिवाय धनुभाऊंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड. आणि याच एका क्लिपचा वापर करून विरोधकांनी धनंजय मुंडेंना सोशल मीडियावरही प्रचंड ट्रोल केलं अन् धारेवर धरलं.
• मुंडेंची फडणवीस अन् अजितदादांशी जवळीक. खरंतर धनंजय मुंडे हे आता अजित पवारांच्या पक्षातले असले तरी ते सुरुवातीपासून संघाच्या शिस्तीत वाढलेले, फडणवीसांसह भाजपातल्या बड्या नेत्यांशीही त्यांची जवळीक आहे, आपुलकीचे संबंध आहेत. त्याचाच प्रत्यय आपल्याला २०१९ साली पहाटेच्या शपथविधीवेळीही पाहायला मिळाला होता. त्यामुळे धनंजय मुंडे हे कुठेतरी बीड जिल्ह्यावरचं आपलं वर्चस्व सिद्ध करुन मराठवाड्याचं नेतृत्व होऊ पाहताहेत.
पण तेच बीड जिल्ह्यातल्या संदीप क्षीरसागर, सुरेश धस तर मराठवाड्यातील असणाऱ्या संजय शिरसाट यांनाही नकोय का? असा सवाल उपस्थित झालाय. कारण आता, बीड जिल्ह्यातील आमदारांसह संजय शिरसाटांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. कुठेतरी अंतर्गत धगधगता विस्तव हा आता मुंडेंच्या विरुद्ध टोकाची टीका करणाऱ्या नेत्यांच्या मुखातूनही दिसायला लागला आहे.
• राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-अजितदादांचं सरकार आहे, त्यातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्ता कापायला बसलेत, शिंदे मजा बघताहेत तर अजितदादांची पुन्हा गोची झाली आहे. विधानसभेला टिंगरेंनी नाचक्की केली होती तर, आता निकालानंतर धनंजय मुंडेंनी अडचणीत आणलंय. त्यामुळे वारंवार अजितदादांनाही विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी झगडावं लागतंय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
• बीडमधलं जातीय समीकरण-
बीड जिल्ह्याबाबत सांगायचं तर, सहा आमदार आहेत. त्यातले तीन आमदार ते म्हणजे गेवराईचे विजयसिंह पंडीत, आष्टीचे सुरेश धस, माजलगावचे प्रकाश सोळंके हे मराठा समाजाचे आहेत. तर, परळीचे आमदार धनंजय मुंडे वंजारी समाजाचे, बीड शहरचे आमदार संदीप क्षीरसागर हे तेली समाजाचे आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा याही SC आहेत. पण, या बीड जिल्ह्यावर कायम बिगर मराठा समाजाचं वर्चस्व राहिलंय. म्हणजे सुरुवातीला तेली समाजाच्या केसरबाई क्षीरसागर, त्यानंतर मराठा समाजाचे जयसिंगराव गायकवाड मग पुन्हा वंजारी समाजाचे गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व राहिलंय. पण आता धनंजय मुंडेंचं वर्चस्व किंवा जिल्ह्याचं नेतृत्व मिळू नये, असं मराठा आणि इतर समाजाच्या नेत्या, पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याची चर्चा आहे. कारण बीड जिल्ह्यात राजकारण करताना धनंजय मुंडे हे साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करतात. त्यामुळे ते पालकमंत्री झाले तर आपल्याला अडचणी होऊ शकतात अशीही तिथल्या स्थानिक आमदारांमध्ये भीती असल्याचं बोललं जातंय.
दुसरीकडे सुरेश धस यांनाही आता मराठा समाजाचा चेहरा व्हायचं असल्यानं ते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय पोळी भाजून घेत असल्याचंही एका गटात बोललं जातंय. कारण लोकसभेला मराठा समाजाचा रोष महायुतीला परवडला नाही. तर, विधानसभेला लाडक्या बहिणीनं धनुभाऊं सकट महायुतीला तारलं असं मान्यच केलं पाहिजे. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या. नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मुंडेंचं नेतृत्व नसावं आणि आपल्याला यश मिळावं यासाठीही स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंना एकटं पाडलं जात असल्याची चर्चा आहे.











