सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम; दररोज सरासरी ८४४ शेतकऱ्यांना लाभ

0

शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. या योजनेच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसविण्यात आल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी दिली.

राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकाळ पैसे भरूनही पंप मिळाले नसल्याचा (पेड पेंडिंग) प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी केला असून त्यानुसार या योजनेला गती देण्यात आली आहे.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसविण्याचा उच्चांक गाठल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. या योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसविण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसविणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे.

दिवसा कधीही सिंचन करता येणे शक्य

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

सौर पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचे वीजबिल येत नाही. हे पंप पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येते. त्यामुळे दिवसा वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वाधिक आकडेवारी डिसेंबर महिन्यातील

राज्यात महावितरणच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात २१ हजार ९५१ सौर कृषी पंप बसविण्यात आले, अर्थात दररोज सरासरी ८४४ पंप बसविण्यात आले. ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे. सन २०१५ ते २०२३ पर्यंत विविध योजनेत एक लाख ८० हजार सौर पंप बसविण्यात आले होते. तथापि, यावर्षी मार्च २०२४ पासून आतापर्यंत फक्त आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात एक लाख ५८ हजार सौर पंप बसविण्यात आले आहेत.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय