केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ या विधेयकासंदर्भात बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानावरुन विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. असं असतानाच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाहांच्या मदतीला धावून आले आहेत. मोदींनी तब्बल सहा वेगवेगळ्या दिर्घ पोस्ट करत काँग्रेसवर आंबेडकरांच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. अमित शाहांनी काँग्रेसची काळी बाजू जनतेसमोर आणली, असं म्हणत मोदींनी त्यांची पाठराखण केली आहे.






भारताच्या लोकांनी वेळोवेळी पाहिलं आहे की…
पंतप्रधान मोदींनी आंबेडकरांसाठी त्यांच्या सरकारने काय काय केलं याचा पाढा वाचून दाखवतानाच काँग्रेसच्या काळात काय काय झालं याबद्दल भाष्य केलं आहे. “जर काँग्रेस आणि त्यांच्या सडलेल्या इकोसिस्टीमला असं वाटत असेल की खोटं पसरवून ते मागील अनेक वर्षांपासूनची पापं लपवू शकतील, खास करुन त्यांनी बाबासाहेबांचा केलेला अपमान ते लपवू शकतील असं वाटत असल्यास ती त्यांची मोठी चूक आहे,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. “भारताच्या लोकांनी वेळोवेळी पाहिलं आहे की, कशाप्रकारे एका पक्षाने घराणेशाहीच्या माध्यमातून शक्य त्या सर्व घाणेरड्या ट्रीक्सच्या माध्यमातून बाबासाहेबांची वारश्याचा अपमान केला आणि एससी एसटी समाजाला कशाप्रकारे अपमानित केलं,” असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.
पापाची यादी…
‘काँग्रेसने बाबासाहेबांसंदर्भात केलेल्या पापाची यादी’ असं म्हणत मोदींनी काही मुद्दे मांडले आहेत.
काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीत एकदा नाही तर दोनदा पराभूत केलं.
पंतप्रधान नेहरुंनी आंबेडकरांविरोधात प्रचार केला. त्यांचा पराभव हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला.
आंबेडकरांना भारतरत्न नाकारला.
निघ्रृण हत्याकांडं घडली…
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना हे नाकारता येणार नाही की त्यांची सत्ता असतानाच एससी आणि एसटी समाजातील लोकांची निघ्रृण हत्याकांडं घडली. ते अनेक वर्ष सत्तेत बसून राहिले पण त्यांनी एससी आणि एसटी समाजाला सक्षम करण्यासाठी काहीही केलं नाही,” असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
शाहांनी काळी बाजू जनतेसमोर आणली
“अमित शाह यांनी काँग्रेसची काळी बाजू जनतेसमोर आणली. काँग्रेसनं वारंवार बाबासाहेब आंबेडकरांचा आणि एससी/एसटी समाजाचा अवमान केला. सादर केलेल्या खऱ्या मुद्द्यांमुळे त्यांना त्रास झाला. त्यामुळेच ते आता नाटकं करत असले तरी लोकांना सत्य ठाऊक आहे,” असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
मागील दहा वर्ष आम्ही न थकता…
“आपण जे काही आहोत ते आंबेडकरांमुळे आहोत. आमच्या सरकारने न थकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीकोनातील देश साकारण्यासाठी काम केलं आहे. मागील दहा वर्ष आम्ही न थकता काम केलं आहे. कोणत्याची क्षेत्राकडे पाहिलं तरी हे दिसून येईल. 25 कोटी लोकांना दारिद्र्यामधून बाहेर काढलं. एससी/एसटी कायदा सक्षम केला. स्वच्छ भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, जल जिवन मोहीम, उज्ज्वला योजना आणि इथरही अनेक योजनांनी समाजातील मागास आणि गरीबांचं आयुष्य बदलणाऱ्या ठरल्यात,” असंही मोदी म्हणालेत.
आमच्या सरकारने हा विषय…
आमच्या सरकारने बाबासाहेबांसंदर्भातील पाच ठिकाणांच्या पंचतिर्थांच्या विकासासाठी कामं केली. अनेक दशकांपासून चैत्यभूमीच्या जमीनीचा प्रश्न होता. आमच्या सरकारने हा विषय मार्गी काढला. मी तिथे प्रार्थनेसाठीही गेले होतो. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची वर्ष घालवली तो दिल्लीतील 26, अलीपूर रोडही विकसित केला. लंडनमध्ये त्यांचं वास्तव्य असलेलं घरही सरकारने ताब्यात घेतलं. आंबेडकरांचा विषय येतो तेव्हा आम्ही त्यांचा पूर्ण सन्मान करतोय हे लक्षात ठेवावं, असंही पंतप्रधान म्हणालेत.
दरम्यान, अमित शाहांच्या या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हातात घेऊन संसदेबाहेर आंदोलन केलं.











