मंत्रिपद जाण्यामागे जरांगे कारणीभूत…; भुजबळ स्पष्टच बोलले

0

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर नव्यानं काही राजकीय नाट्यांचे नवे अध्याय सुरू झाले आणि या साऱ्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे छगन भुजबळ यांच्या नाराजीची. मंत्रिमंडळातून भुजबळांसारख्य़ा वरिष्ठ नेत्याला डावलणं ही मोठी बाब असून, खुद्द भुजबळ यांनीही नागपूरमधील अधिवेशनाआधीपासूनच ही नाराजी अगदी स्पष्टपणे व्यक्त केली.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पोहोचलेल्या भुजबळांनी सुरुवातीला या मुद्द्यावर बोलणं टाळल्यानंतर अखेर विधानभवनातून बाहेर पडल्यानंतर मात्र त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘पक्षाच्या नेत्यांचा जो निर्णय असतो त्याच्याविषयी काय सांगायचं?’, असा प्रश्नार्थक सूर त्यांनी आळवला.

नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जातंय? असा प्रश्न केला असता, ‘असं त्यांनी आम्हाला सांगितलं…’ इतक्या मोजक्या शब्दांत भुजबळांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांना अंगावर घेतलं पण तरीही मंत्रीपदापासून दूर ठेवलं हे आपल्याला मिळालेलं बक्षीस असल्याचं म्हणत उपरोधिक उत्तर भुजबळांनी दिली. जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं असं म्हणत ‘मी सामान्य कार्यकर्ता. मला डावललं काय, फेकलं काय… काय फरक पडतो? मंत्रिपद कितीवेळा आलं आणि किती वेळा गेलं; छगन भुजबळ काही संपला नाही ना…’ असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय समीकरणांवर बोचरा कटाक्ष टाकला.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याशी काही बोलणं झालं का? असा प्रश्न विचारला असता ‘ज्यांनी डावललं त्यांच्याशी बोला’ असं म्हणत नाराजीचा तीव्र सूर त्यांनी वारंवार आळवला.

दरम्यान, मंत्रिमंडळात न घेतल्यानं भुजबळ नाराज आहेत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी यावरून गंभीर आरोप केला आहे. ‘रोहित पवार, जयंत पाटलांना सत्तेत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. त्यामुळे भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याचा आरोप हाके यांनी केला असून, अनेकांच्याच भुवया यामुळं उंचावल्या आहेत.